
योग्यता प्रमाणपत्राच्या फीमध्ये वाढ
योग्यता प्रमाणपत्राच्या फीमध्ये वाढ
---
सीमा भागातील विद्यार्थ्यांना फटका; कर्नाटकातून प्रवेशांची संख्या रोडावली
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २१ : कोल्हापूर विभागीय मंडळाने योग्यता प्रमाणपत्राच्या फीमध्ये भरमसाट वाढ केल्याने कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येऊन शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या महाग झाले आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील महाविद्यालयातील प्रवेश निश्चित करण्यासाठी योग्यता प्रमाणपत्राची गरज असते. सदर योग्यता प्रमाणपत्राचे नाममात्र असणारे शुल्क कोल्हापूर विभागीय मंडळाने चालू वर्षी वाढविल्याने सीमाभागातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे झाले आहे. यामुळे शैक्षणिक वर्षात कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क कमी करावे, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांतून होत आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रदेशातील मराठी भाषिक विद्यार्थी कर्नाटकातील महाराष्ट्रात व महाराष्ट्रातील कर्नाटकात जाऊन शिक्षण घेतात. राज्याची सीमा बदल झाल्याने सदर विद्यार्थ्यांना ज्या राज्यात शिक्षण घ्यावयाचे आहे. त्याठिकाणच्या परीक्षा मंडळाकडून योग्यता प्रमाणपत्र (इलिजिबिलिटी सर्टिफिकेट) मिळवावे लागते. त्यासाठी सदर विद्यार्थी विहित नमुन्यातील फॉर्म भरून विभागीय मंडळाकडे योग्यता प्रमाणपत्राची मागणी करतो. पण, फॉर्म फी १०० रुपयांवरून २०० रुपये केली आहे. तसेच, नोंदणी फी ३०० रुपये होती, ती यावर्षी ६०० रुपये केली आहे. दंडाची रक्कम प्रतिदिन पाच रुपये होती. मात्र, यावर्षी ती रक्कम २० रुपये केली आहे. एकंदरीत शुल्कात दुप्पट वाढ केली. मात्र, महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला कर्नाटकात हे प्रमाणपत्र केवळ ९० रुपयांत प्राप्त होते. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कर्नाटकात जाऊन शिक्षण घेणे सोपे झाले आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाने योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वाढविलेले शुल्क जास्त असल्याने सीमाभागातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने पालक व विद्यार्थ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे. याचा परिणाम यावर्षी सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर झाला. विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शुल्क कमी करावे, अशी मागणी होत आहे.
-----------------
शिवाजी विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रदेशातील ८६५ मराठी भाषिक गावांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सवलतीत प्रवेश योजना सुरू केली आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी ही सवलत योजना लागू केली. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ, तर विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के शुल्क सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असताना विभागीय मंडळाने सीमाभागातील विद्यार्थ्यांना योग्यता प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ करून मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे.
-----------------------
कोल्हापूर विभागीय मंडळाने योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क कमी करावे. सीमा भागातील विद्यार्थ्यांना ती न परवडणारी असल्याने यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.
- प्रा. एस. टी. कदम, अध्यक्ष, चंदगड तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79468 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..