
मायक्रो एटीएम''चा
शेतकरी, दूध उत्पादकांना
‘मायक्रो एटीएम’चा आधार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे उपक्रम
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : बॅंकेची शाखा नाही, बॅंक खातेदारांना पैशांची देवाण-घेवाण करण्यास अडचणी येतात, अशा गावांत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे मायक्रो एटीएम सुविधा देऊन खातेदारांची समस्या दूर केली जात आहे. या एटीएमद्वारे खातेदारास ५०० ते १० हजार रुपयांपर्यंत, तर व्यावसायिक खातेदारास प्रतिदिन ५० हजार रुपयांपर्यंत उलाढाल करता येते.
गावातीलच एखाद्या सेवा संस्थेत हे मायक्रो एटीएम कमिशन तत्वावर चालवण्यास दिले जात आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ३८६ मायक्रो एटीएम दिली आहेत. याला चांगला प्रतिसाद आहे.
रिझर्व्ह बॅंक व नाबार्डने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा बॅंकेतील खातेदारांचा व्यवहार सुलभ व्हावा, ग्रामीण भागातील बॅंक खातेदारांना गावातच बॅंकिंग सुविधा मिळावी यासाठी जिल्हा बॅंकेने मायक्रो एटीएमची संकल्पना हाती घेतली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ शेवटच्या आणि तळागाळापर्यंत मिळावा यासाठी ग्रामीण भागात मायक्रो एटीएमची सुविधा दिली जात आहे. जिल्ह्यातील लाखो शेतकरी खातेदार आहेत. त्यांना एका गावातून दुसऱ्या गावात असणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या शाखेत जाण्यास अडचणी येतात. शेतकरी, ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन गावातीलच एखाद्या संस्थेत मायक्रो एटीएम मशिनची सुविधा दिली जात आहे. ज्या संस्थेकडे एटीएम असते त्या संस्थेला दैनंदिन व्यवहारानुसार कमिशनही दिले जात आहे. मायक्रो एटीएम म्हणजे जिल्हा बॅंकेची एखादी छोटीशी शाखा म्हणूनच काम करत आहे.
चौकट
*मायक्रो एटीएमचा लाभ
-दूध उत्पादकांना बिले आणण्यासाठी बॅंकेत जावे लागत नाही.
-बचत गटांचा व्यवहार गावपातळीवरच होतो.
-शेतकऱ्यांना ऊस बिले किंवा बचत खाते
उघडण्यास लांबच्या बॅंक शाखेत जावे लागत नाही.
-छोट्या व्यावसायिकांना गावातच आपली रक्कम
बचत किंवा चालू खात्यावर भरता येणार.
-गावातच रोख रक्कम भरता आणि काढता येणार.
कोट
जिल्हा बॅंकेच्या मायक्रो एटीएमद्वारे ग्रामीण भागातील खातेदारांना चांगली आणि वेळेत सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. जेथे जिल्हा बॅंकेची शाखा नाही, अशा ठिकाणी प्राधान्याने मायक्रो एटीएम दिले जाते.
-डॉ. ए. बी. माने, मुख्य कार्यकारी अधिकारी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79590 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..