
लाच लुचपत कारवाई
37676
मनपाचा कनिष्ठ अभियंता जाळ्यात
नळजोडणीसाठी १० हजार लाचेची मागणी; रंकाळ स्टँन्ड परिसरात कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः नवीन नळ कनेक्शनच्या मंजुरीसाठी १० हजाराची लाच घेताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. राजेंद्र बळवंत हुजरे (वय ४५, आर. के. नगर) असे त्या संशयिताचे नाव आहे. रंकाळा स्टँड परिसरात ही कारवाई केल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती, संशयित राजेंद्र हुजरे महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता आहेत. तक्रारदार हे मान्यता प्राप्त प्लंबर आहेत. त्यांनी त्यांच्या ग्राहकांचे नवीन नळ जोडणीचे प्रकरण मंजुरीसाठी विभागात सादर केले होते. हे प्रकरण मंजुरीसाठी हुजरे यांनी त्यांच्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी १९ जुलैला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर छत्रपती शिवाजी मार्केट कार्यालयात सापळ्याचे नियोजन केले. पण हुजरे यांनी तक्रादारांना आज रंकाळा स्टँन्ड परिसरात येण्यास सांगितले. त्यानुसार सापळा लावून त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले. ही कारवाई श्री. बुधवंत, पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर अमंलदार शरद पोरे, रूपेश माने, संदीप पडवळ यांनी केली.
चौकट ः
आठ लाखांची रोकड जप्त
संशयित हुजरे यांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली. यात आठ लाखांची रोकड मिळून आली. ती पंचासमक्ष जप्त करण्यात आली असल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.
------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79621 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..