
तोतया आयबी अधिकाऱ्यास अटक
फोटो : 37735
तोतया आय. बी. अधिकाऱ्यास अटक
एलसीबीची कारवाई : नोकरीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक
सांगली, ता. २१ : इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) चा अधिकारी असून आय. बी.मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया अभिषेक रामचंद्र वैद्य (वय २८, रा. विठ्ठल मंदिरजवळ, आरग, ता. मिरज) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
अधिक माहिती अशी, सूरज व्यंकटराव सूर्यवंशी (रा. जटाळ कॉलनी, लातूर) यांचा भोसरी, पिंपरी-चिंचवड येथे टुर्स-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरात गाडी चालवत असताना संशयित अभिषेक वैद्य याच्याशी ओळख झाली. तेव्हा अभिषेकने आय. बी.मध्ये अधिकारी असल्याचे सांगितले. फिर्यादी सूर्यवंशी यांच्या गावी जाऊन त्याने अभियंता लोकांसाठी आयबी खात्यात भरती निघाल्याचे सांगितले. अधिकारी असल्यामुळे तुमचे नोकरीचे काम करून देतो, असे सांगितले. तसेच मार्केटमध्ये बिटकॉईन आणि शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होतो, असे सांगितले. सूर्यवंशी यांनी अभिषेकच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
आय. बी.मधील नोकरीसाठी साडेतीन लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर ई-मेल पाठवून नोकरी लागल्याचे सूर्यवंशी यांना भासवले. त्यांच्याकडून फोन पे वरून साडेतीन लाख रुपये घेतले. तसेच सूर्यवंशी यांच्या ओळखीचे अमित पटसाळगे व जय संतोष डहाळे यांना देखील आय. बी.मध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून ७५ हजार रुपये व दीड लाख रुपये घेतले. एक जून २०२२ ते १५ जुलै २०२२ या काळात हा प्रकार घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यातील संशयित हा आरग येथे आल्याची माहिती गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांना मिळाली. निरीक्षक अजय सिंदकर याच्या सूचनेनुसार त्यांनी आरग येथे जाऊन अभिषेकला ताब्यात घेतले. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. उपनिरीक्षक विशाल येळेकर, कर्मचारी संदीप नलावडे, प्रशांत माळी, विनायक सुतार, चेतन महाजन, पवन सदामते, दीपक गट्टे, संकेत कानडे, संदीप पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.
…………..
तक्रारदारांनी पुढे यावे -
आय. बी.मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अभिषेक वैद्य याने आणखी काहीजणांची फसवणूक केली असल्यास संबंधितांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.
…………..
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79665 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..