ढोल ताशा वादकांची संख्या वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढोल ताशा वादकांची संख्या वाढली
ढोल ताशा वादकांची संख्या वाढली

ढोल ताशा वादकांची संख्या वाढली

sakal_logo
By

ढोल-ताशांचा गजर घुमणार
गणेशोत्सवासाठी पथकांचा जोरदार सराव, तरुणाईचा सहभाग वाढला

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : गणेशोत्सव म्हंटल की ढोल-ताशांचा गजर आलाच. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सार्वजनिक मिरवणुकांवर बंदी होती. उत्सवावरही मर्यादा होत्या. यंदा उत्सवांवरील निर्बंध उठवल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. कोरोनाची मरगळ झटकून शहरातील ढोल - ताशा पथकांनी सरावास सुरुवात केली आहे. पथकांच्या संख्येसोबतच वादकांचीही संख्या वाढली आहे. मानसिक तणाव कमी करणे, आवड, व्यायाम आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.
शहरात करवीर गर्जना, करवीर नाद, शाहू गर्जना, श्रीमंत ढोल-ताशा पथक, महालक्ष्मी प्रतिष्ठान, जिजाऊ ढोल- ताशा पथक, रणांगण ढोल-ताशा पथक, वादक प्रतिष्ठान, आम्ही कोल्हापूरकर आणि महाराष्ट्र गर्जना अशा सुमारे दहा ढोल-ताशा पथके गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत चैतन्य आणतात. यंदा या पथकांच्या संख्येत आणखी काही पथके सामील होणार आहेत. शहरात पथकांकडून सराव सुरू आहे. सायंकाळी ढोल-ताशांचा आवाज कानावर येत आहे. नव्या वादकांना जास्त सरावाची गरज असते. जुन्या वादकांच्या वादनात दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे त्यांचाही जास्तीचा सराव घेण्याकडे पथके भर देत आहेत. नव्या वादकांना शिकवण्यासोबत जुन्या वादकांसोबत त्यांचा ताळमेळ घालण्यासाठी रोज जास्तीचा सराव केला जात आहे.
पथक मोठे आणि वादनात सर्वोत्कृष्ट व्हावे, यासाठी पथकांतील जुन्या आणि वरिष्ठ वादकांची जुळवाजुळव सुरू आहे. सदस्य वाढल्यानंतर नवे ढोल-ताशा आणणे, जुन्या ढोल-ताशांची दुरुस्ती, पाने बदलणे अशी कामे करण्यासाठी लगबग सुरू आहे. पथकांना नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था, पथकांतील सदस्यांसाठी नवे गणवेश अशा कित्येक बाबीसाठी आर्थिक जुळवाजुळव पथकांतील वरिष्ठांना करावी लागते.

कोट
यंदा ढोल-ताशा वादकांची संख्या वाढत आहे. तरुण, तरुणी, महिलांसोबत बालकांनीही पथकात प्रवेश घेतला आहे. दोन वर्षे ढोल वाजवायला न मिळाल्याने मोठ्या संख्येने वादक ढोल पथकांत सहभागी होत आहेत.
- कपिलराज नांगरे, करवीर नाद

कोट
यंदा मिरवणुकींवर निर्बंध नसल्याने ढोल-ताशा पथके पूर्ण उत्साहाने वादन करतील. त्यामुळे काही वर्षात काही पथके जी सुप्तावस्थेत होती त्यांनीही यंदा सरावाला सुरवात केली आहे. वादनातून मिळणारा आनंद घेण्यासाठी अनेकजण पथकात सहभागी होत आहेत.
- प्रशांत नागवेकर, महालक्ष्मी प्रतिष्ठान

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79752 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..