
हिरण्यकेशी नदीवरील जूना गोटूर बंधारा हटला
गडहिंग्लज - हिरण्यकेशी नदीवरील नांगनूरजवळ दहा फुटाच्या अंतरात असणाऱ्या जुन्या व नव्या बंधाऱ्यामुळे वाढणारे पाण्याचे तुंब यंदा मर्यादित दिसला. कारण, पीक नुकसानीला कारणीभूत असलेला जुना बंधारा यंदा काढल्याने पाण्याचा तुंब मर्यादित राहून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षभर हा बंधारा हटवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.
चार किलोमीटरच्या अंतरात नदीमध्ये पाच बंधारे आहेत. नांगनूरजवळचा गोटूर बंधारा जीर्ण झाल्याने नवीन बांधला. परंतु जुना बंधारा हटवला नव्हता. महापुरात त्याचा परिणाम मोठा जाणवायचा. गतवर्षीच्या महापुरात जवळजवळ असलेल्या बंधाऱ्यामुळे अपेक्षित वेगाने पाणी पुढे जात नव्हते. परिणामी या पाण्याचा तुंब खणदाळ-निलजीपर्यंत यायचा. नदीत पात्रात पाणी कमी दिसत असले तरी या भागातील पाणी पात्राबाहेर पडायचे. यामुळे शेतकऱ्यांचे गवत व पिकांचे नुकसान होत असे.
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळावे म्हणून जुना बंधारा हटवण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्यासह नांगनूर ग्रामस्थ आणि भारतीय किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने कर्नाटककडे पाठपुरावा केला. पाटबंधारे अधिकाऱ्यांपासून मंत्र्यापर्यंत फेऱ्या मारून बंधारा हटवण्यात वर्षानंतर यंदा यश आले. जुलैच्या पहिल्या पंधरावड्यातील पावसाने नदीला पूर आला. गोटूरसह इतर दोन बंधारे पाण्याखाली गेले. यंदा एकच बंधारा असल्याने पाण्याचा प्रवाह पूर्वेकडे गतीने सुरु होता. बंधारे पाण्याखाली गेले तरी पाणी म्हणावे तसे पात्राबाहेर नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले नाही. जुन्या बंधाऱ्यामुळे गतवर्षी असलेली पूरस्थिती आणि यंदाच्या पूरस्थितीवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनीच बंधारा हटवल्याचा लाभ झाल्याचे सांगत होते.
दोन बंधाऱ्यांमुळे हिरण्यकेशी पात्रातील पाण्याच्या प्रवाहात अडथळा होता. यंदा जुना बंधारा हटवल्याने पाण्याची फूग गतवर्षीपेक्षा काहीशी कमी होती. शिवाय अधिक दिवस फूगही राहिली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या गवताचे नुकसान टळले.
- प्रदीप कदम, उपअभियंता पाटबंधारे विभाग.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79812 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..