दिनकरराव शिंदेवर पुस्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिनकरराव शिंदेवर पुस्तक
दिनकरराव शिंदेवर पुस्तक

दिनकरराव शिंदेवर पुस्तक

sakal_logo
By

37857

दिनकरराव शिंदे यांच्यावर पुस्तक
ऑलिम्पिकमध्ये शड्डू घुमवणारे कोल्हापूरचे पहिले पैलवान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले; पण त्याही अगोदर १९२० मध्ये अँटवर्प येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये शिवाजी पेठेतील पैलवान दिनकरराव शिंदे यांनी कोल्हापूरची पताका फडकवली होती. अत्यंत तगड्या पैलवानांशी झुंज देत त्यांनी चौथे स्थान पटकावले. भवानी मंडपातील क्रीडा स्तंभावरही त्यांचेच पहिले नाव आहे. त्यांचे हे सारे कर्तृत्व आता ‘भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर'' या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर उलगडणार आहे. (कै) शिंदे यांचे नात जावई व चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

- दीड तोळे सोन्याचे पदक
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेतून करवीर संस्थानात मल्लविद्येची जोपासना झाली आणि अनेक नामवंत मल्ल घडले. त्यात दिनकरराव शिंदे हे आघाडीचे नाव. वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच त्यांनी कुस्तीचे फड गाजवायला सुरुवात केली. ११० पौंडांखालील गटात त्यांनी अनेक बक्षिसांची लयलूट केली. बालगंधर्व यांच्याकडून त्यांना सोन्याचे पदक देऊन गौरवले. डेक्कन जिमखान्यावर सलग चार दिवस झालेल्या कुस्ती मैदानातही त्यांनी चुणूक दाखवत बक्षिसे मिळवली. तत्कालीन मुंबई गव्हर्नरांकडून त्यांना दीड तोळे सोन्याचे पदक देऊन गौरवले. देशभरातील अनेक मैदानं गाजवत असताना पुढे वीसाव्या वर्षी बेल्जियममधील अँटवर्प येथे झालेल्या ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाली. त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेल्या निवड प्रक्रियेच्या अनेक आठवणी आजही सांगितल्या जातात. प्रत्यक्ष ऑलिम्पिकच्या मैदानात त्यांच्या पाच मल्लांशी कुस्त्या झाल्या. त्यात फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, अमेरिका येथील तगड्या मल्लांचा समावेश होता. इंग्लंडच्या एच. इंचमन या मल्लाकडून ते हरले; पण त्यांच्या कौशल्याची प्रशंसा ऑलिम्पिकमधील प्रतिस्पर्धी सर्वच मल्लांनी केली. ही पत्रेही पुस्तकातून सर्वांसमोर येणार आहेत.

-शिवाजी पेठेत होणार लोकोत्सव
ऑलिम्पिकमधील यशानंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना करवीर संस्थानच्या नोकरीत सामावून घेत सन्मान केला. पंत अमात्य बावडेकर आखाड्यात वस्ताद म्हणून त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्याशिवाय कोल्हापूरच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडीतही त्यांचा सक्रिय पुढाकार राहिला. शेतकरी कामगार पक्षाशी अखेरपर्यंत त्यांनी निष्ठा जपली. शिवाजी तरुण मंडळाचेही तेच संस्थापक. या पार्श्वभूमीवर शिवाजी पेठेतर्फे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय आज झाला. शिवाजी मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुजित चव्हाण होते. चंद्रकांत यादव, विकास जाधव, महेश जाधव, तालीम संघाचे अशोक पोवार, अशोकराव साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. तुकाराम इंगवले, केशवराव जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, श्रीकांत भोसले, प्रतापसिंह जाधव, राजू जाधव, लाला गायकवाड, अजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शाहीर दिलीप सावंत यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79886 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top