
इचल: यंदा शहरात हालते देखावे दिसणार
इचलकरंजीकरांना दिसणार हालते देखावे
राज्य सरकारने गणेश चतुर्थी निर्बंधमुक्त केल्याचा परिणाम
संदीप जगताप ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २२ ः आगामी गणेश चतुर्थी निर्बंधमुक्त होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केल्याने गणेश मंडळांच्या समवेत मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. इचलकरंजी हे उंच गणेश मूर्तीसोबत मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या हालत्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र २०१९ महापूर त्यानंतर २०२० ते २०२१ हे कोरोनाच्या निर्बंधामध्ये गेले. त्यामुळे तीन वर्षांत शहरात एकाही ठिकाणी देखावे उभे केले नाहीत. उत्सव मूर्तीसोबत देखाव्याच्या मूर्तीमधून कुंभाराना चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र देखावे व मूर्ती उंचीवर बंधने असल्याने कुंभार समाजाच्या आर्थिक संकटामध्ये वाढ झाली होती. यंदा मात्र निर्बंध दूर झाल्यामुळे कुंभारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इचलकरंजी शहरात ७७२ हून अधिक मंडळे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यामधील काही गणेश मंडळे हालते देखावे करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. गणेश चतुर्थीस हे देखावे पाहण्यासाठी शहर परिसर, कर्नाटक सीमा भाग येथून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे शहराची आर्थिक उलाढाल कोट्यवधीमध्ये होत होती. एका देखाव्यासाठी १० ते १५ मूर्तीचा सहभाग असल्याने त्यांचा खर्च लाखो रुपयांमध्ये होत होता. कुंभार गल्लीमध्ये देखाव्याच्या मूर्ती तयार करण्यासाठी राज्यातून मंडळे येत होती. त्यामुळे कुंभार बांधवांना आर्थिक उत्पन्न चांगले होत होते. मात्र तीन वर्षे पूर व कोरोनामध्ये गेल्याने व या वर्षी राज्य सरकारने निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
----
सजीव देखाव्यांत घट
हालत्या देखाव्यांसोबत शहरात सजीव देखावे मोठ्या प्रमाणात करण्यात येत होते. त्यांच्या माध्यमातून नागरिकांना गर्भलिंग निदान, मुलींची हत्या, हुंडा बळी, जातीयता, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी याबाबत प्रबोधन करण्यात येत होते. नागरिक ही अशा सजीव देखाव्यांना तल्लीन होऊन प्रतिसाद देत असत. मात्र सध्या सजीव देखावे कमी होत आहेत.
----
आमचे वार्षिक उत्पन्न हे गणेश चतुर्थीवर अवलंबून असते. मात्र तीन वर्षे पूर व कोरोनाचा फटका बसल्याने मोठ्या आर्थिक संकटामधून जावे लागले आहे. यंदा निर्बंध नसल्याने चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा वाटत आहे.
टी. कुंभार, मूर्ती कारागीर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79897 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..