मुलांने पांग फेडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांने पांग फेडले
मुलांने पांग फेडले

मुलांने पांग फेडले

sakal_logo
By

38058

बूट पॉलिश करणाऱ्या बापाचे मुलाने फेडले पांग
..................
शिक्षणासाठी गाठले थेट मँचेस्टर ः कागलच्या श्रेयस गाडेकरचा प्रवास
........................
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः घरी अठरा विश्‍व दारिद्र्य, वडिलांचा पारंपरिक बूट पॉलिशचा व्यवसाय, घरात शिक्षणाचा गंधही नाही, पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कागलच्या श्रेयस गाडेकर या तरुणाने राज्य शासनाची शिष्यवृत्ती मिळवून थेट मँचेस्टरमध्ये शिक्षणासाठी प्रवेश मिळवून बूट पॉलिश करून कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या बापाचे पांग फेडले आहेत.
दाभोळकर कॉर्नरजवळील सिग्नलच्या पश्‍चिमेला हॉटेल सम्राट आहे. या हॉटेलच्या पायरीवरच महादेव गाडेकर गेली २५ वर्षे बूट पॉलिशचा व्यवसाय करतात. ते मूळचे कागलचे. त्यांना श्रेयस हा एकुलता मुलगा. मुलाने पारंपरिक व्यवसायात न पडता वेगळी वाट निवडावी, हा महादेव यांचा हट्ट. त्याला मुलगा श्रेयस यानेही साथ दिली आणि राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीमुळे तो केमिकल इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी थेट मँचेस्टर देशात दाखल झाला. वर्षभरापासून तो या देशात अभ्यास करतोय. श्रेयस याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण कागलच्या हॉलिडे इन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. पहिलीपासूनच हुशार असलेल्या श्रेयसने दहावीत मिळवलेल्या गुणांच्या जोरावर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये १२ वीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेतले. बारावीतही चांगले गुण मिळाल्यानंतर बुधगांव येथील वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. या विषयातूनही तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला. त्याचवेळी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाची योजना सुरू होती. या योजनेसाठी त्याने अर्ज केला. त्यासाठीची परीक्षाही तो चांगल्या मार्गाने पास होऊन तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. या कामी त्याला कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे सहकार्य मिळाले. दोन वर्षांच्या काळात तो केमिकल इंजिनिअरिंग विषयातील ‘मास्टर ऑफ सायन्स’ (एमएस) पदवी घेणार आहे. मुळातच हुशार असलेल्या श्रेयसची जिद्द बघून त्याच्या शिक्षणासाठी वडिलांनी तर प्रयत्न केलेच; पण इतर नातेवाईकही त्याच्या पाठीशी ठाम उभे राहिले. उच्च शिक्षणासाठी झालेल्या निवडीबद्दल कागलमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या उपस्थितीत त्याचा सत्कारही झाला.
......................
लोकांच्या सहकार्यातूनच शक्य-गाडेकर
माझ्या घरात शिक्षणाची परंपरा नाही; पण मुलाने चांगले शिक्षण घ्यावे ही इच्छा होती. मी २५ वर्षे कोल्हापुरात बूट पॉलिशचा व्यवसाय करतो, हेच काय ते कमाईचे साधन; पण परमेश्‍वराची कृपा, प्रकाश गाडेकर यांच्यासह जवळचे नातेवाईक, मित्र मंडळीचे सहकार्य यातून श्रेयस शिक्षणासाठी मँचेस्टरला पोहचला, त्याचा आनंद आहे. त्याच्या निमित्ताने मला पहिल्यांदा मुंबई बघण्याची संधी मिळाली.
-महादेव गाडेकर, श्रेयसचे वडील.

..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80131 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..