
मागणी केलेल्या ठिकाणीच भूखंड द्या
38427
गडहिंग्लज : आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देताना शिवाजी गुरव, आनंदा गुरव, शिवाजी शिंदे, चंद्रभागा कदम आदी.
मागणी केलेल्या ठिकाणीच भूखंड द्या
संग्राम संघटना; अन्यथा स्वातंत्र्यदिनी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : आंबेओहळ धरणग्रस्तांनी लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे भूखंडाची मागणी केली होती; पण राजकीय हस्तक्षेपामुळे मागणी नसलेल्या ठिकाणी भूखंड दिले जात आहेत. त्याला विरोध असून मागणी केलेल्या ठिकाणीच भूखंड द्यावेत, अन्यथा स्वांतत्र्यदिनी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेने दिला आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
आंबेओहळ धरणग्रस्तांना राहत्या घरापासून आठ किलोमीटर अंतराच्या बाहेर पुनर्वसनात जमीन मिळाली आहे. अशा धरणग्रस्तांना त्यांच्या मागणीनुसार घर बांधणीसाठी भूखंड मिळावेत असा कायदा आहे. त्यानुसार धरणग्रस्तांनी लिंगनूर कसबा नूल येथे भूखंडाची मागणी केली आहे. आजरा येथे झालेल्या शिबिरात तसे अर्जही दिले आहेत. असे असताना राजकीय हस्तक्षेप करून धरणग्रस्तांत भेदभाव केला जात आहे. मागणी नसलेल्या ठिकाणी कडगाव येथे भूखंड दिले जात आहेत. त्याला विरोध असून मागणीप्रमाणे लिंगनूर येथेच भूखंड मिळावेत, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी निवेदन स्वीकारले. आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, आनंदा गुरव, शिवाजी शिंदे, गणपती पावले, चंद्रभागा कदम, गणपती शिंदे, रोहिनी चौगुले यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80591 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..