
पान एक-आता आरक्षण सोडत 28 ला
फोटो - 38574
गट, गणांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; ओबीसी आरक्षणासह रचना ठरणार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः मार्च २०२२ मध्ये पंचवार्षिक मुदत संपून सध्या प्रशासक कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुन्हा जाहीर करण्यात आला होता. या आधी १३ जुलैचा सोडत कार्यक्रम स्थगित केला होता. ओबीसी आरक्षणानंतर २८ ला आरक्षण सोडत होत आहे. जिल्हा परिषद गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे, तर पंचायत समितीच्या गणांसाठी त्या-त्या तहसील कार्यालयात आरक्षण सोडत होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली.
जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१) कलम ५८ (१) अ प्रमाणे व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येतील. आरक्षण सोडत त्या दिवशी सकाळी साडेअकराला जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या नियोजन सभागृहात सभा होईल. आरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी २ ऑगस्टपर्यंत आहे. वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग पंचायत समितींसाठी तहसील कार्यालयामध्ये त्या दिवशी २८ ला सकाळी ११.३० वाजता सभा घेण्यात येणार आहे. या सभेत प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीद्वारे काढण्यात आलेल्या आरक्षणाबाबत संबंधित तहसीलदारांकडे हरकती व सूचना सादर करण्यासाठी ता. २ ऑगस्टपर्यंत कालावधी असणार आहे. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी संबंधित ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
दृष्टिक्षेपात
ता. २९ - आरक्षणाची प्रारुप प्रसिद्धी -
ता. २९ ते २ ऑगस्टपर्यंत - हरकती
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80761 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..