
म्युकरमायकोसिस
सावधान... म्युकर मायकोसिस येतोय
---
दोन महिन्यांत पाच रुग्ण; खबरदारी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः कोरोनापाठोपाठ आलेल्या म्युकर मायकोसिसने गेल्या वर्षी जिल्ह्याला हादरा दिला होता. ‘सीपीआर’च्या कान- नाक- घसा विभागाने उपचारांत आघाडी घेत म्युकर मायकोसिस नियंत्रणात आला. असे असताना गेल्या दोन महिन्यांत पाच रुग्ण आढळले आहेत. त्यातील तीन ‘सीपीआर’मध्ये उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस डोके वर काढण्याची शक्यता असून, वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन कान- नाक- घसा तज्ज्ञ डॉ. अजित लोकरे यांनी केले आहे.
१८ मे २०२१ ला कोल्हापुरात पहिला म्युकरचा रुग्ण सापडला. त्यानंतर चार महिन्यांत रुग्णसंख्येने शंभरी गाठली. अशात खासगी कान- नाक-घसा तज्ज्ञांकडे उपचार होणे मुश्कील झाले. याच वेळी ‘सीपीआर’च्या कान- नाक- घसा विभागात म्युकरच्या रुग्णांची तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया करणे सुरू केले. म्युकर बरा होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे कोल्हापूरसह कोकण, सांगली, सातारा, बेळगावमधील म्युकरचे रुग्ण ‘सीपीआर’मध्ये येऊ लागले. त्यातील ९६ टक्के रुग्ण बरे झाले.
असे असताना यंदा जूनपासून पुन्हा म्युकरचे रुग्ण वाढू लागले आहेत. गंभीर रुग्ण ‘सीपीआर’कडे आले. त्यातील दोघांवर शस्त्रक्रिया व पुढे उपचार झाल्यावर तेही बरे झाले. सध्या तीन रुग्ण उपचार घेत आहेत. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील एका रुग्णावर आज शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
कोट
मधुमेही व्यक्ती, पोस्ट कोविडच्या व्यक्ती तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, अशा व्यक्तींना म्युकर मायकोसिसचा धोका जास्त आहे. अशा व्यक्तींनी लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत. ‘सीपीआर’मध्येही आजवर १८७ जणांनी ‘म्युकर’ उपचार घेतले. यातील २३० व्यक्तींवर म्युकरच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे.
- डॉ. अजित लोकरे, कान- नाक- घसा विभागप्रमुख, ‘सीपीआर’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81030 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..