
मजूर, भाताची रोपांची दरवाढ आणि टंचाई
38785
कोवाड : भात रोपांच्या लागणीच्या कामाला अशी गती आली आहे
मजूर, भाताची रोपांची
दरवाढ आणि टंचाई
हंगाम साधण्यासाठी एकाच वेळी धडपड
कोवाड, ता. २७ : कोवाड परिसरात भाताच्या रोप लागणीची धांदल उडाली आहे. लागणीचे हंगाम साधण्यासाठी सर्वांची एकाच वेळी धडपड सुरू आहे. पण मजुरांची वाढलेली मजुरी आणि भात रोपांचा वधारलेला भाव, याचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. मजूर व भाताची रोपे यांचे दर वाढलेले आहेतच शिवाय त्यांचा पुरवठा मर्यादित असल्याने टंचाईचा सामना करण्याची वेळही शेतकऱ्यांवर आली आहे.
मजूर व रोपांची मागणी जास्त आहे. पण त्यांचा पुरवठा कमी झाल्याने दर कडालले आहेत. ऐरवी एकमेकाला मोफत दिली जाणारी रोपं आता विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या हवामानाचा फटका भात उगवणीला बसल्याने शेतकऱ्यांना १५ रुपये एक पेंढी यादराने भाताची रोपांची विक्री सुरू आहे. सध्या भात रोप लागणीचे काम जोरदार सुरू आहे. पण मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजूर मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक मजुरांचा तुटवडा असलेल्या ठिकाणी बाहेर गावचे मजूर जास्तीची मजुरी देऊन आणले जात आहेत. मोठ्या शेतकऱ्यांना शक्य असले तरी छोट्या शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. २५० ते ३०० रुपये मजुरीचे दर झाल्याने शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बैलांच्या मदतीने शेतात चिखल मळण्याचे काम केले जात होते. पण बैलांची संख्या कमी झाल्याने छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल करण्याचे काम वाढले आहे. पावसाची उघडझाप झाल्याने भात उगवण चांगली झाली नाही. पेरणी केलेल्या शेतातही भाताची रोप लागण करण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे. त्यामुळे सर्वत्र रोपांची मागणी एकाच वेळी वाढली. पण रोपांचा पुरवठा कमी असल्याने तुटवडा जावणू लागला.
------------
चौकट
रोप १५ रुपये पेंढी...
लागणचे काम एकाच वेळी सुरू असल्याने सर्वांची रोपं मिळविण्याची घाई आहे. ज्यांच्याकडे रोप आहेत. त्यांना आगाऊ पैसे देऊन रोपांची मागणी केली जात आहे. त्यामुळे १५ रुपये एक पेंढी असा दर सुरू झाला. भाताच्या जातीनुसार हा दरही वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81112 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..