सहकार लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार लेख
सहकार लेख

सहकार लेख

sakal_logo
By

सहकाराने आणली जिल्ह्यात समृद्धी

लीड
‘विना संस्कार, नाही सहकार, विना सहकार नही उद्धार’ हे सहकाराचे ब्रीद वाक्य. लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ म्हणजे सहकार. या तत्त्‍वातूनच केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्र ही सहकार पंढरी म्हणून ओळखली जाऊ लागली. आज सहकार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. त्यामागे अनेक ज्ञात, अज्ञांताबरोबरच सहकार रुजवलेल्या मान्यवरांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, कै. विलासराव देशमुख, सहकार महर्षी कै. यशवंतराव मोहिते, कै. तात्यासाहेब कोरे, कै. डी. सी. नरके, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यासारख्या दिग्गजांनी सहकार क्षेत्रात नुसते कामच केले नाही. तर पुढच्या अनेक पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती निर्माण केली आहे. आज सहकारात घुसलेल्या काही अपप्रवृत्तीमुळे बदनाम होत असला तरी चांगल्या कामाची पाळेमुळे घट्ट रोवली गेल्याने सहकार हा केवळ अर्थकारणाचे प्रमुख केंद्र नाही. तर रोजगार, उद्योग निर्माण करणारे मोठे क्षेत्र बनले आहे.
- निवास चौगले

देशात स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९०६ साली सहकार कायद्या करण्यात आला. पण स्वातंत्र्यानंतरच सहकाराला खऱ्या अर्थाने बहर आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सहकार अधिक बहरत गेला. आज देशात महाराष्ट्राइतका समृद्ध, प्रगत आणि विश्‍वासार्ह सहकार अन्य राज्यात नाही. विकास सेवा सोसायट्या, पतसंस्था, सहकारी दूध संस्था, विविध गृहनिर्माण संस्था, नागरी बँका, पाणीपुरवठा संस्था आदीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि गावागावांत सहकाराची बीजे घट्ट रोवली आहेत. त्यातून अर्थकारणाला चालना देण्याचे काम सुरू आहे. केवळ चालनाच नव्हे तर साखर कारखाने, मोठ्या संस्था आणि राजकीय व्यक्तींच्या पुढारातून अनेक सहकारी संस्थांनी उभारलेल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची गंगाही घरोघरी पोहचवण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रात झाले आहे.
शेतीसाठी सर्वाधिक कर्जपुरवठा हा सहकार विभागातूनच होत आहे. जिल्हा बँकेला नाबार्डकडून अर्थपुरवठा केला जातो. जिल्हा बँक विकास सोसायटीच्या माध्यमातून हे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करतात. तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने तर त्यापेक्षा अधिक कर्ज नाममात्र व्याजाने शेतकऱ्यांना दिले जाते. कर्ज वाटपाचीही त्रिसदस्यीय पद्धत संपूर्ण राज्यात अवलंबली जाते. आज कोल्हापूर जिल्ह्यात एकट्या जिल्हा बँकेकडून दरवर्षी सुमारे २२५० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा शेती कर्जासाठी केला जातो. राष्ट्रीयीकृत्त व अन्य बँकांकडून ६५० कोटी रुपयांचा तर विकास सोसायट्यांकडून मध्यम मुदतीच्या कर्जापोटी ६०० ते ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक कृषी कर्जात केली जाते. या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील समृद्ध अशा सहकाराची प्रचिती येऊ शकते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून दिल्या जाणाऱ्या एकरकमी एफआरपीपोटी ४७०० कोटींची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जाते. याशिवाय या उद्योगांकडून विविध कराच्या माध्यमातून २२०० कोटी रुपयांचा महसूल केंद्र व राज्य शासनाला दिला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यात वारणा व गोकुळसह अन्य काही दूध संघ असले तरी खरी धवलक्रांतीही ‘गोकुळ’ मुळे जिल्ह्यात झाली आहे. सुमारे साडेपाच हजार प्राथमिक दूध संस्थांकडून दूध संकलन करून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उपपदार्थ तयार करणाऱ्या ‘गोकुळ’ची आजची वार्षिक उलाढाल सुमारे २२०० कोटींची आहे. संघाकडून मिळणाऱ्या नफ्यापैकी तब्बल ८२ टक्के रक्कमही उत्पादकाला दिली जाते. दर दहा दिवसांनी संघाकडून सुमारे ५० कोटी रुपये उत्पादक महिलांच्या खात्यावर जमा केले जातात.
सहकाराचे विस्तृत जाळे साखर उद्योग आणि ‘गोकुळ’, वारणा यासारख्या संघामुळे कोल्हापूर असो किंवा सांगली जिल्ह्यात दुष्काळ पडो किंवा महापूर, अतिवृष्टीचा फटका बसला तरी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण नगण्य आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात अन्य सर्व व्यवसाय ठप्प असताना केवळ गोकुळ दूध संघ, साखर कारखान्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अर्थकारण कायम ठेवले, त्यातून शेतकरी, ग्रामीण भागातील दूध उत्पादाकाला मोठा आधार मिळाला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थकारणालाच केवळ सहकाराने बळ दिले, असे नाही तर या माध्यमातून रोजगारांच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या. सर्वांनाच सरकारी नोकऱ्या देणे शक्य नाही, त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या सूतगिरणी, दूध संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्थासह इतर संस्था या रोजगार निर्मितीची केंद्रे बनली आहेत. याशिवाय शासनाच्या विविध योजनांतून उद्योग सुरू करू पाहणाऱ्या तरुणांना अर्थिक पाठबळ देण्याचे काम जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी बँकांनी केले आहे. आज नागरी बँकांची संख्या कमी असली तरी त्यांच्याकडून सुरू असलेले काम अतिशय चांगले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून सहकार कायद्यात होत असलेल्या बदलांना आव्हान देत सहकार क्षेत्राची ही वाटचाल सुरू आहे.
९७ व्या घटना दुरुस्तीमुळे सहकार कायद्यात अनेक आमूलाग्र बदल झाले, त्यातून काही संस्था तावून सलाखून निघाल्या पण सहकाराला बळ देण्याचे काम या नव्या घटना दुरुस्तीने झाले. गेल्या दहा बारा वर्षांत या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती घुसल्या, त्यातून नागरी पतसंस्थांसारख्या ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेल्या चळवळीला धक्का बसला, काही संस्था बंद पडल्या पण त्यातून काही संस्थानी आदर्श असे काम जिल्ह्यात आणि पश्‍चिम महाराष्ट्रात केले आहे.
आता केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते निर्माण केले आहे, त्यातून नव्याने निघणाऱ्या आदेशांचे आव्हान राज्यातील सहकार क्षेत्रासमोर आहे. नागरी बँकांवर लादण्यात आलेल्या आयकराचा प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहे, तो सुटला तर या क्षेत्रातील बँकांही उंच भरारी घेतील.
.................
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार
जिल्हा बँक - १, दूध संघ- २, बाजार समित्या- ५, शिक्षक बँक - १, सूतगिरणी - २३, साखर कारखाने - १५, तालुका खेरदी विक्री संघ - १६, नागरी बँका - ४२, दूध संस्था - ५०२६, विकास सोसायट्या - १८७७, पतसंस्था - २०००, नोकरदार पतसंस्था - ३४९, मजूर संस्था - २९७. पणन संस्था - २९६, पाणीपुरवठा- ४७१, गृहनिर्माण - ५४०.
.............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81197 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..