
माजी अध्यक्षांसह पदाधिकार्यांना झटका आरक्षण सोडत
जिल्हा परिषद लोगो
विद्यमान ३५ सदस्यांना दणका
आरक्षण सोडत; माजी अध्यक्ष रिंगणाबाहेर; डझनभर पदाधिकाऱ्यांना विश्रांती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : जिल्हा परिषदेच्या ७६ गटांसाठी आज आरक्षण सोडत नगाली. सोडतीत माजी अध्यक्ष उमेश आपटे, बजरंग पाटील, राहुल पाटील यांचे गट ओबीसी व महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे एकतर त्यांना रिंगणाबाहेर जावे लागेल किंवा सुरक्षित मतदारसंघाचा शोध घ्यावा लागेल. याचबरोबर डझनभर पदाधिकाऱ्यांसह किमान ३५ सदस्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे. आरक्षण जाहीर होताच अनेक माजी सदस्यांनी ओबीसीच्या दाखल्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
माजी अध्यक्ष उमेश आपटे यांचा गट ओबीसीसाठी, बजरंग पाटील व राहुल पाटील या दोन माजी अध्यक्षांचा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील (कळे), माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत तसेच माजी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, माजी शिक्षण सभापती अंबरिष घाटगे यांचा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, स्वाती सासणे व कोमल मिसाळ तसेच माजी महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे व शिवानी भोसले मतदार संघात आरक्षण पडल्याने त्यांची अडचण झाली आहे.
ज्येष्ठ माजी सदस्य अरुण इंगवले यांचा गट तर प्रभागरचनेत बदलून गेला असून तेथेही आरक्षण पडले आहे. विजय बोरगे, भगवान पाटील, राजवर्धन निंबाळकर, शिवाजी मोरे, शंकर पाटील, राणी खेमलेटटी, रेखा हत्तरकी, जीवन पाटील, स्वरुपाराणी जाधव, मनोज फराकटे, मनिषा टोणपे, अरुण सुतार, विद्या पाटील अशा किमान ३५ सदस्यांच्या मतदार संघातील आरक्षणात बदल झाला आहे.
कबनूरचा गट
जिल्हा परिषदेसाठी साधारण ३३ ते ४० हजारपर्यंतच्या लोकसंख्येचा एक गट केला आहे. यात कबनूर या एकाच ग्रामपंचायतीचा गट तयार केला आहे. कबनूरची लोकसंख्या ३३ हजार ४९९ इतकी आहे. सर्वाधिक ग्रामंचायती भुदरगड तालुक्यातील कडगाव गटात आहेत. या गटात ३३ ग्रामपंचायती व ४७ गावांचा समावेश आहे.
महाडिक विरुद्ध खवरे
निवडणुकीत अनेक लढती या लक्षवेधी राहतील. यात सर्वाधिक काटा लढत असेल ती हातकणंगले तालुक्यातील शिरोली गटात. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक विरुद्ध खवरे गटातील लढत लक्षवेधी राहण्याची शक्यता आहे.
ओबीसी व अन्य मार्गांची चाचपणी
मावळत्या सभागृहात खुल्या गटातून निवडून आलेल्या सदस्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण घेवून पुन्हा सभागृहात येण्यासाठी फिल्डींग लावली आहे. वाडवडिलांचे शाळेचे दाखले शोधणे, अधिकारी शोधणे, नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर शेजारील मतदारसंघात काही संधी आहे का, याचीही चाचपणीही सुरू झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81728 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..