स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स

sakal_logo
By

सर्व आवृत्त्यांना आवश्‍यक
फोटो... जयंत पाटील

राज्यातील सत्तेसाठी भविष्यात नवी
राजकीय समीकरणेही येऊ शकतील
---
जयंत पाटील; ‘स्थानिक स्वराज्य’च्या निवडणुका मविआ म्हणून लढविणार
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २८ ः राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. शिवसेना पक्षाने १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. देशात न्याय व्यवस्था शिल्लक असेल तर तसा निर्णय पुढे येईल. त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते. असे झाले तर मात्र ज्या-त्या वेळच्या परिस्थितीवर चर्चा, बैठकांतून पुढील धोरण ठरवावे लागेल. कदाचित, त्यावेळी वेगळी राजकीय समीकरणेही पुढे येऊ शकतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून लढविल्या जातील, त्यासाठी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
सांगलीत प्रदेशाध्यक्ष पाटील आज महापालिका क्षेत्रातील पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्याशीही काही वेळ चर्चा केली. आजच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची आरक्षण सोडत झाली. इच्छुकांनीही या वेळी गर्दी केली होती.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. आम्ही सध्या प्रबळ विरोधक म्हणून चोख कामगिरी पार पाडणार आहोत. सत्तांतरानंतर सध्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे दुर्लक्ष होत आहे. हे सरकार अद्यापही ‘झाडी... डोंगर...’ असे व्हिडिओ करण्यातच रममाण आहे. खरे तर आतापर्यंत सरकारचे काम सुरू व्हायला हवे होते. तसे चित्र सध्या दिसत नाही. शिवसेना सोडून गेलेल्यांना फळ मिळाल्याशिवाय पुढील कामकाज सुरू होणार नाही, असे वाटते. शिवसेनेतून आमदार फुटून गेल्याप्रकरणी १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत आमदार पाटील म्हणाले, की देशात न्याय व्यवस्था शिल्लक असेल तर तसा निर्णय पुढे येईल. त्यांना अपात्र ठरविले जाऊ शकते. असे झाले तर मात्र ज्या-त्या वेळच्या परिस्थितीवर चर्चा, बैठकांतून पुढील धोरण ठरवावे लागेल. कदाचित, त्या वेळी वेगळी राजकीय समीकरणेही पुढे येऊ शकतील. राज्यातील नऊ महापालिकांसह ९२ पालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडी म्हणून घटक पक्ष असलेले काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढविणार आहेत. त्यासाठी राज्यपातळीवर लवकरच चर्चा केली जाईल. या निवडणुकीत एकत्र लढण्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीची ताकद कळेल.
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या निधीवाटपाला स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. यातील एकही रुपया निधीचे काम आमदार, मंत्री यांच्या फायद्याचे नाही. सर्व कामे जनतेच्याच हिताची आहेत. याचीही खात्री झाल्यावर सध्या रोखलेला निधीही पुन्हा त्या कामांना मिळणार आहे. त्यासाठी काही कालावधी लागेल. सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएससीसाठी निधीची कमतरता पडणार नाही. यापूर्वीच जिल्हा नियोजनमधून निधी दिला आहे. पुढील सरकारही तेच धोरण घेईल, असेही ते म्हणाले.
........
चौकट...
इस्लामपुरात शिंदे समर्थकांची गुंडगिरी...
इस्लामपूर येथील एका नगरसेवक पतीला मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी होण्यासाठी झालेल्या मारहाणीबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थकांनी दिलेली ‘ऑफर’ नाकारल्याने गुंडगिरी, दहशत या मार्गांचा अवलंब केला जात आहे. राज्यात आमचे सरकार आहे, तुम्ही काही करू शकत नाही, असे त्यांना वाटत असावे, असेही ते म्हणाले.
.........................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81750 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top