
अभय नेवगींकडून पन्नास लाख
३९२४७, ३९२४८
कावळा नाका परिसरात मुली, महिलांसाठी वसतिगृह
बालकल्याण संस्थेचा प्रकल्प; ॲड. नेवगी परिवारातर्फे पन्नास लाखांचा निधी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : उच्च व सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. अभय नेवगी आणि परिवारातर्फे बालकल्याण संस्थेला पन्नास लाखांचा निधी दिला जाणार आहे. आई तिलोत्तमा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संस्थेच्या महिला वसतिगृहासाठी निधीचा धनादेश ते शनिवारी (ता. ३०) संस्थेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सुपूर्द करणार आहेत.
ॲड. नेवगी यांच्या परिवाराने बालकल्याण संस्थेला नेहमीच हात दिला आहे. विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे खटलेही ते या दोन्ही कुटुंबीयांतर्फे लढवत आहेत. त्याशिवाय राज्यभरातील अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या मुलांच्या उच्च न्यायालयातील केसेसही ॲड. नेवगीच लढवतात. बालकल्याण संस्थेला कावळा नाका येथे मिळालेल्या जागेत महिलांसाठी वसतिगृह उभारले जात असून त्यासाठी अडीच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी समाजातून निधी उभारला गेला. वसतिगृहासाठी निधी कमी पडत असल्याची माहिती मिळताच ॲड. नेवगी यांनी पन्नास लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. ॲड. नेवगी यांनी वकिल झाल्यानंतर पहिली केस बालकल्याण संकुलाचीच लढवली होती. त्यावेळी संस्थेने दिलेले पाचशे रुपयांचे मानधनही त्यांनी संस्थेला परत दिले होते. ॲड. नेवगी सांगतात, ‘‘माझा जन्म पुण्यात झाला. वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते आणि आई गोखले कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. वडिल विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असताना आई माझ्या भावंडांसोबत राहत होती. आईला नेहमीच कोल्हापूर सुरक्षित वाटत होते. किंबहुना या शहराशी तिचे अतूट नाते होते. शहराचे आपण काही तरी देणे लागतो. त्यासाठी जे जे करता येईल, ते करण्याची तिची इच्छा होती. याच भावनेतून महिला वसतिगृहांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला. भाऊ सुनील, वहिणी शैला नेवगी यांनीही तो तत्काळ मान्य केला.’’
दरम्यान, वसतिगृहासाठी संस्थेचे विश्वस्त सुरेश शिपूरकर, व्ही. बी. पाटील, पद्मजा तिवले, एस. एन. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
प्रा. तिलोत्तमा नेवगी यांचे नाव
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर म्हणाले, ‘‘बालकल्याण संस्थेतर्फे प्रौढ मुली व महिलांसाठी वसतिगृह उभारले असून या वसतिगृहाला प्रा. तिलोत्तमा नेवगी यांचे नाव दिले जाणार आहे. चार मजली वसतिगृहात अत्याधुनिक सुविधा असतील. ॲड. नेवगी परिवाराने संस्थेला नेहमीच पाठबळ दिले आहे. ॲड. नेवगी यांच्यासह देशभरातील विविध संस्था व सेवाभावी व्यक्तींनी सुमारे अडीच कोटींचा निधी संस्थेला दिला आणि त्यातून हे वसतिगृह उभारले असून येत्या महिनाभरात त्याचे उद्घाटन होईल.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81758 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..