इचलकरंजीत बससेवेबाबत उत्सुकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत बससेवेबाबत उत्सुकता
इचलकरंजीत बससेवेबाबत उत्सुकता

इचलकरंजीत बससेवेबाबत उत्सुकता

sakal_logo
By

इचलकरंजीत बससेवेबाबत उत्सुकता
महापालिकेत परिवहन विभागाची तीन पदे मंजुरीमुळे चर्चा; वाहतूक व्यवस्थेतही होणार सुधारणा
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २८ ः राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने इचलकरंजी महापालिकेसाठी नुकतीच ३४ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. यामध्ये परिवहन विभागासाठी तीन पदांचा महत्त्‍वाचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने पुढील काळात सीटी बस सेवा सुरू होणार काय, याची उत्सुकता आहे. वास्तविक हे मोठे आव्हान असले तरी किमान या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये चांगली सुधारणा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. इचलकरंजी पालिकेचे महापालिकेत रुपांतर केले आहे. त्यानंतर प्रशासकीय कामकाजात अनेक चांगले बदल होताना तूर्तास तरी दिसत आहेत. प्रशासकीय कामकाजास लागलेली शिस्त हा एक त्याचाच भाग आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरील कारवाईने तर जोरदार आघाडी घेतली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तातडीने ३४ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. लवकरच ही पदे भरल्यानंतर प्रशासकीय कामकाजास गती येणार आहे. यातील तीन पदे ही परिवहन विभागाशी संबंधित आहेत. यामध्ये परिवहन व्यवस्थापक, उप परिवहन व्यवस्थापक व आगार व्यवस्थापक अशा पदांचा समावेश आहे. यामुळे महापालिकेच्या माध्यमातून पुढील काळात सीटी बससेवा सुरू होण्याची चर्चेला वाव मिळत आहे.
वास्तविक महापालिकांसमोर सीटी बससेवा सुरू करणे हे मोठे आव्हान असते. महाराष्ट्रातील अनेक महापालिकांना ही सेवा सुरू करण्यास उत्सुकता दाखवलेली नाही. हा पांढरा हत्ती पोसणे सोपे नाही. त्यामुळे अगदी पूणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, मुंबई, कोल्हापूर अशा काही मोजक्याच महापालिकांनी ही सेवा दिली आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेच्या माध्यमातून ही सेवा सुरू करणे तसे मोठे आव्हान आहे. मुळात शासनाच्या राज्य परिवहन विभागाकडून यापूर्वी बससेवा सुरू होती. मात्र कालांतराने ती बंद केली. त्यानंतर सातत्याने पालिकेच्या माध्यमातून पण खासगी तत्त्‍वावर सीटी बससेवा सुरू करता येईल काय, याबाबत सातत्याने चर्चा झाली. पण तांत्रिक अडचणीमुळे त्याबाबत पुढे ठोस हालचाली झाल्या नाहीत.
----
शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर
पुढील काळात सीटी बस सेवा सुरू होईल हे आता ठामपणे सांगणे अशक्य आहे. पण या विभागाच्या तीन अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी मिळाली आहे. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर शहरातील वाहतुकीसंदर्भातील काही प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत मिळणार आहे. सध्या शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. यापूर्वी शहर वाहतूक आराखडा तयार केला. त्याची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.
----
सुलभ वाहतुकीच्या अपेक्षा
अद्यापही अनेक ठिकाणी सिग्नल व्यवस्था आवश्यक आहे. पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची ठरली आहे. त्यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. शहर वाहतूक शाखेकडून सातत्याने पालिकेकडे बोट दाखवले जाते. पण आता महापालिका झाल्यामुळे जबाबदार अधिकारी येणार आहेत. त्यामुळे सीटी बससेवेसह प्रलंबित वाहतूक प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81820 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top