कोल्हापूर महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीकडे नागरिकांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur municipal corporation
ना उत्सुकता ना इर्षा

कोल्हापूर महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीकडे नागरिकांची पाठ

कोल्हापूर - ओबीसी आरक्षण असल्याने कोणती जागा मिळेल?, कोणाची संधी जाईल? याच्या उत्सुकतेने महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीसाठी गर्दी होईल हा अंदाज पूर्णतः फोल ठरला. पहिल्या काही रांगा सोडल्यास बहुतांश सभागृह रिकामेच होते. त्यामुळे सभागृहात ना उत्सुकता पाहायला मिळाली, ना इर्षेचे वातावरण होते. प्रशासनाने टप्प्याटप्प्याने राबविलेल्या प्रक्रियेत काही शंका नसल्याने तसेच काही सूचनांबाबत खुलासा केल्याने अडीच तासात प्रक्रिया पूर्ण झाली.

एकसदस्यीय, नंतर त्रिसदस्यीय प्रभागासाठीच्या अशा दोन सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज ओबीसीसह त्रिसदस्यीय प्रभागासाठी आरक्षण सोडतीची तयारी प्रशासनाने केली होती. ओबीसीच्या जागांचा समावेश झाल्याने सर्वसाधारणमधील जागा कमी होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे कोणाची संधी जाणार की राहणार याबरोबर प्रभागात काय होणार? याची उत्सुकता होती.

सकाळी नऊ पासूनच प्रशासनाची यंत्रणा होती. पोलिस बंदोबस्तही होता. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई उपस्थित होते. पहिल्या रांगेत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे मोजके नेते सोडल्यास कमी लोक होते. पहिल्या रांगेपासून निम्म्याच रांगांत तुरळक नागरिक होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, सुनील देसाई, अनिल कदम, किसन कल्याणकर, बाबा जगताप, कॉंग्रेसचे अमर समर्थ, भाजपचे अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, चंद्रकांत घाटगे, शिवसेनेचे किशोर घाटगे आदी उपस्थित होते. ११ वाजता उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रक्रियेला प्रारंभ केला. राजकीय कार्यकर्ते प्रभागनिहाय आरक्षण लिहून घेत होते. ओबीसी, त्यातील महिला व नंतर सर्वसाधारणमधील महिलांचे आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर कोणत्या प्रभागात सर्वसाधारणसाठी, तर कुठे ओबीसी, अनुसूचित जातीसाठी संधी राहणार याची चर्चा करत होते.

उपनगरातून आलेले कार्यकर्ते प्रभागाच्या आजूबाजूचे काय झाले याचीही माहिती घेत होते. तर मध्यवस्तीतील इच्छूक, कार्यकर्ते सोडत संपेपर्यंत निघून गेले. महिला आरक्षण असल्याने ओबीसी प्रभागातील आरक्षण झाल्यानंतर ओबीसीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते बाहेर पडत होते. तर सर्वसाधारणमधील इच्छुकही या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण झाल्यानंतर निघून गेले.

आरोग्य तपासणी
सोडतीसाठी येणाऱ्या नागरिकांची आरोग्याची तपासणी करून नाट्यगृहात सोडण्यात येत होते. त्यासाठी चार डॉक्टर नेमले होते. आवश्‍यकता वाटल्यास गोळ्याही देण्याची व्यवस्था होती. याशिवाय अग्निशमन दलाचे जवानही तैनात केले होते.

‘निवडणूक तेवढी लवकर घ्या’
सोडत पूर्ण झाल्यानंतर आर. के. पोवार यांनी ‘‘तिसऱ्यांदा सोडतीसाठी उपस्थित होतो. सोडत प्रक्रिया व्यवस्थित झाली असली तरी आता निवडणूक तेवढी लवकर घ्या’’ असे सांगितले. सोडत होत असतानाही ‘निवडणूक केंव्हा होणार आहे? अशी विचारणा त्यांनी उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे केली. त्यावेळी आडसूळ यांनी ‘ते आमच्या हातात नाही असे सांगितले. यामुळे इच्छुकांत निवडणुकीबाबत साशंकता होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81973 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top