
कमी पटसंख्येच्या ११ शाळांवर गंडातर
महापालिका फोटो
----------------------
कमी पटसंख्येच्या ११ शाळांवर गंडातर
अन्य शाळांत होणार समायोजन; इचलकरंजी महापालिका प्रशासनाचा निर्णय
इचलकरंजी, ता. २९ ः पटसंख्या कमी असल्याचे कारण देत महापालिका शिक्षण विभागाकडील ११ प्राथमिक शाळा अन्य शाळांत समायोजन करण्यात येणार आहेत. या विभागाकडील बहुतांश शाळांची पटसंख्या भरपूर असताना काही शाळांच्या पटसंख्येला मात्र गळती लागली आहे. त्यामुळे या शाळा बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. मात्र सुदैवाने समायोजन करण्यात येणाऱ्या शाळा कायमस्वरुपी बंद होणार नाहीत. पुढील वर्षी पटसंख्या वाढल्यास या शाळा पुनर्जीवित केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तत्कालीन पालिकेच्या तब्बल ५६ प्राथमिक शाळा होत्या. तब्बल तीस हजार इतकी विद्यार्थ्यांची पटसंख्या होती. मात्र कालांतराने खासगी शिक्षण संस्थांचे पेव फुटल्यानंतर मात्र पालिकेच्या शाळांचे भवितव्य धोक्यात आले. अलीकडच्या काळात या शाळांची संख्या ४७ वर येऊन ठेपली होती. आता आणखी ११ शाळा बंद पडणार आहेत. त्यामुळे ही संख्या ३६ पर्यंत खाली आली आहे. भविष्यात आणखी काही शाळा बंद करण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या केवळ ७७०० इतकी विद्यार्थी संख्या आहे.
विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे पाहून रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ येथे वेगळा पॅटर्न राबवला. सध्या तेथे पहिली ते आठवीपर्यंत १५३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका शाळेत तर दोन विद्यार्थी व दोन शिक्षक अशी परिस्थिती असल्याचे समोर आले. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत शाळांची पटसंख्या आहे. विशेष म्हणजे अनेक शाळांत पहिली ते सातवीचे वर्ग एकाच ठिकाणी भरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब समोर आल्यानंतर याची तपासणी केली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासक सुधाकर देशमुख यांनी तब्बल ११ शाळा अन्य सोयीच्या ठिकाणी असलेल्या अन्य शाळांत समायोजन करण्यास मंजुरी दिली आहे.
------
शिक्षकांचा तुटवडा कमी होणार
तब्बल ११ शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे २५ हून अधिक शिक्षक उपलब्ध होणार आहेत. रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनकडे ९ शिक्षकांची गरज आहे. येथे हे शिक्षक दिले जाणार आहेत. याशिवाय पटसंख्या जास्त असणाऱ्या गरजेच्या ठिकाणी या शिक्षकांना वर्ग केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांचा तुटवडा कमी होणार असून विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान कमी होणार आहे.
-------------
समायोजन करण्यात येणाऱ्या शाळा अशा (कंसात शाळा क्रमांक)
शाळेचे नाव* पटसंख्या* शिक्षक संख्या* या शाळेत होणार समायोजन
आदी व्यंकटराव (१)*२१* २* जयभवानी (११)
छत्रपती शिवाजी (६)*१५*२* जयभवानी (११)
अनुबाई कन्या (१६)*२२*२*जयभवानी (११)
डॉ. हेगडेवार (५३)*१९*३* वेणूताई चव्हाण (५४)
यशवंतराव चव्हाण (४४)*२७* ३* कर्मवीर पाटील (४२)
नेताजी सुभाषचंद्र बोस (२३)*४*१*पं. जवाहरलाल नेहरु (२४)
दत्ताजीराव कदम (४९)*२१*२* पं. जवाहरलाल नेहरु (२४)
छत्रपती शाहू (३२)*१९*१* आण्णा रामगोंडा (५)
संत गाडगेबाबा (५०)*३६*३* भारतमाता (३३)
म. जोतिराव फुले (१२)*६*१*कस्तुरबा गांधी (३८)
इंदिरा गांधी (२६)*२*२*कस्तुरबा गांधी (३८)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82065 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..