
गडहिंग्लज पोलिसही उतरले रस्त्यावर
39445
गडहिंग्लज : वाढत्या फसवणूक, चोरींच्या प्रकारावर जनजागृती करताना पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे. शेजारी नागरिक.
गडहिंग्लज पोलिसही उतरले रस्त्यावर
प्रबोधनाचे धडे; वाढती फसवणूक, चोऱ्यांबद्दल केली जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : शहरात अलीकडील सहा महिन्यांत फसवणूक व चोऱ्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या प्रबोधनासाठी आता पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. फसवणूक प्रकरणात कोणती खबरदारी घ्यायची याबाबतची जागृती ठिकठिकाणी प्रमुख चौकात पोलिसांकडून होत आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.
पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. पहिल्यांदा बाजारपेठेतील लक्ष्मी मंदिर परिसरात वडणे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीबाबत प्रबोधन केले. एक-दोन व्यक्ती पोलिस असल्याचे सांगून वृद्ध नागरिकांना थांबवतात. या ठिकाणी चोरी झाल्याचे सांगून अंगावरील दागिने काढून रूमालात बांधून देतात. प्रत्यक्षात रूमालात मात्र दागिने नसतात. त्यानंतर फसवणूक झाल्याचा पश्चाताप होतो. कोणीही पोलिस, सीबीआय, सीआयडी, क्राईम ब्रँचचे कर्मचारी रस्त्यात अडवून दागिने, पैसे मागत नाहीत. खोटे सांगून मागत असतील, तर अजिबात त्यांना वस्तू देऊ नका. जबरदस्ती होत असल्यास ओरड करून बाजूच्या लोकांना बोलवा. ते ही शक्य नसेल तर बाजूला येऊन पोलिस ठाण्याला फोन करा.
बाजारात फिरताना मोबाईल हॅण्डसेट शर्टाच्यावरील खिशात ठेवू नका. गेल्या रविवारी एकाच दिवशी चार मोबाईल चोरीला गेले आहेत. निपाणी आणि कर्नाटकातून असे चोरटे बाजारात येत आहेत. वरच्या खिशातील मोबाईल सहजपणे चोरता येतो. यामुळे नेहमी पँटच्या खिशातच मोबाईल ठेवावे. ऑनलाईन शॉपिंग करतानाही खबरदारी बाळगावी. कोणत्याही वस्तूची ऑनलाईन खरेदी केली असेल तर वस्तू हातात मिळेपर्यंत पैसे देवू नका. अलीकडेच ६५ हजाराचा मोबाईल सात हजाराला असल्याची जाहिरात करुन एकाची फसवणूक झाली आहे. तसा तक्रार अर्जही पोलिस ठाण्यात आला आहे. फसवणूक झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा ती होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी.
चौकट...
पाणीसुद्धा देत नाही...
सोने पॉलिश करून देतो असे सांगत काही लोक दारात येतात. अहो, या जमान्यात कोणी फुकटचे पाणी देत नाही. अशा परिस्थितीत पॉलिश करून देण्यासाठी स्वत:हून दारात कोणी येईल का, हा साधा विचार लोकांनी करावा. आपल्या विश्वासार्ह दुकानात जाऊनच दागिने पॉलिश करुन घ्यावेत, असा सल्लाही वडणे यांनी दिला. साध्या, सोप्या व कळेल अशा भाषेत त्यांनी केलेल्या प्रबोधनाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82106 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..