
१
मत-मतांतरे
---------
भोलानाथ नंदी होताहेत दुर्मिळ
भोलानाथ ‘नंदी’ महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमधील एक वाहन असून, ते शिवाचे वाहन आहे. या नंदीला सजवून गावोगावी फिरणारी काळा कोटवाली एक जमात आहे. हे या नंदीला सजवून-शिकवून त्याला मान डोलवायला लावतात. नंदीच्या गळ्यात घंटामाळ, पायात झांजर, शिंगाला पितळी शेंब्या, रंगबेरंगी कपड्यांचे तुकडे व झूल घातली जाते. कपाळावर गणपती, महादेव व मारुती यांचा पितळी टाक लावून त्याला दारोदारी फिरविले जाते. नंदीला ‘सांग सांग भोलानाथ’ म्हणून मान डोलवायचा इशारा केला जातो आणि लोकांकडून धान्य-पैसे याची मागणी केली जाते. पण, ही जुनी संस्कृती परंपरा आता इतिहासजमा होऊ लागली. पशुधन घटत असून, बैलही दुर्मिळ होत चालले. त्यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)
‘भूक’ लेख अप्रतिम
मैत्रीण या पुरवणीत (‘सकाळ’) दिलखुलास सदरात ‘भूक’ हा कांचन अधिकारी यांचा लेख अगदी दिलखुलास असाच झाला. उपवर झालेल्या मुला-मुलींनी व इतरांनीही अवश्य वाचावा, असा लेखनाचा सार आहे. ‘भूक’ हा शब्द वाचकांना चांगल्या प्रकारे समज देतो. लेखिकेने अप्रतिम लेखन केले आहे. तहान-भूक लागलेला माणूस सर्वत्र वेगवेगळ्या ठिकणी दर्शन देत जातो. मनोरंजनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विविध प्रसंगांची सुंदर मांडणी केली. यात मन ते विचार व शरीरावर नियंत्रण हा सारा सार अगदी दिलखुलास झाला आहे. त्यांच्या लेखनशैलीतून रोखठोक स्पष्टता दिसून येते.
बाजीराव शिंदे, कोल्हापूर
स्वच्छतेबाबत प्रत्येकाने आग्रही असावे
गेली सव्वादोन वर्षे कोरोनासह अन्य नवनवीन रोगांचे आगमन होत असल्याने जनतेची भीतीने गाळण उडाली आहे. कोल्हापूर महापालिका ‘स्वच्छ व सुंदर कोल्हापूर’ असे अभियान राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती करते. पण, प्रत्यक्ष कचरा कोंडाळे अनेक ठिकाणी भरलेले दिसतात. त्याला पर्याय म्हणून प्रत्येक प्रभागातील सर्व आजी-माजी नगरसेवक व नागरिकांनी जातीने लक्ष घालून स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. रोगराई दूर करण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहरासाठी स्वच्छतेबाबत प्रत्येकाने सतत आग्रही असावे. असे झाले तरच नागरिकांचे जीवन आरोग्यमयी, सुदृढ व निरोगी राहील.
गजानन लोखंडे, कोल्हापूर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82144 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..