वानरांचा उच्छाद, तर टस्कराचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वानरांचा उच्छाद, तर टस्कराचा धुमाकूळ
वानरांचा उच्छाद, तर टस्कराचा धुमाकूळ

वानरांचा उच्छाद, तर टस्कराचा धुमाकूळ

sakal_logo
By

गावात वानरांचा उच्छाद,
शेतीत टस्कराचा धुमाकूळ
हाळोलीकर त्रस्त; बंदोबस्त करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३० : हाळोली (ता. आजरा) गावात वानरांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. घरावरची कौले फोडणे, घरातील धान्य पळविणे असे प्रकार घडत आहेत. हे एकीकडे सुरू असताना गेले आठ दिवस टस्करानेही हाळोलीकरांना चांगलेच बेजार करून सोडले आहे. ऊस, बांबू यासह भात पिकांचे तो नुकसान करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ते करीत आहेत.
हाळोली गावात गेले तीन वर्षे वानरांचा वावर वाढला आहे. दहा-बारा वानरे गावातील छप्परावरून उड्या मारत असून अनेकांच्या घराची कौले फो़डली आहेत. त्याचबरोबर घरावरील पाण्याच्या टाकीचे झाकण तोडणे, पाण्याचे पाईप मोडणे असे प्रकार करीत आहेत. घरात कोणी नसलेले पाहून धान्याची चोरीही टोळी करीत आहे. एका वृद्धेच्या घरातील भूईमुगाच्या शेंगा व हरभऱ्यांच्या पिशव्या वानरांनी पळविल्या. ग्रामस्थ या मर्कटलिलांनी चांगलेच हैराण झाले आहेत. हे गावात घडत असताना दुसरीकडे शिवारात टस्कर धुडगूस घालत आहे. टस्कराने शेतातील उभी पिके तुडवून टाकली आहेत. यामुळे ऊस, भात, बांबूचे नुकसान होत आहे. दररोज सायंकाळी हत्ती चाळोबाच्या जंगलातून हाळोली गावात उतरतो. शेतातील ऊस, केळी, मेसकाठी पिकांवर ताव मारतो. पिकात चांगलाच धुडगूस घालतो. येथील शेतकरी विश्राम धुरे यांनी नुकतीच भात रोपलावण केली होती. त्यात हत्तीने लोळून नुकसान केले. अनेक शेतकऱ्यांचे ऊस, मेसकाठी, बांबूचे नुकसान केले आहे.
--------
चौकट
वनविभागाची तारेवरची कसरत
वनविभागाचे पथक टस्कराच्या मागावर दररोज आहे. अनेकदा टस्कर गुंगारा देत असतो. त्यामुळे टस्कराचा नेमका मार्ग काढणे पथकाला अडचणीचे होते. त्याचबरोबर वानरांच्या कळपाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे पुरेस मनुष्यबळ व संरक्षक साहित्य नसल्याने वनविभाग हतबल झाला आहे. त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82185 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top