योग्य मूल्यमापन करणारा शैक्षणिक कार्यक्रम हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योग्य मूल्यमापन करणारा  शैक्षणिक कार्यक्रम हवा
योग्य मूल्यमापन करणारा शैक्षणिक कार्यक्रम हवा

योग्य मूल्यमापन करणारा शैक्षणिक कार्यक्रम हवा

sakal_logo
By

40680
-----------------------------------

गुणात्मक शिक्षण वाढावे

देशाच्या शैक्षणिक क्षेत्राची सद्यस्थिती पाहता त्याची संख्यात्मक वाढ जेवढी वेगाने होताना दिसते तेवढी गुणात्मक दर्जा मात्र शिक्षण व्यवस्थेतून फारकत घेतो की काय असे वाटू लागले आहे. अलीकडेच केंद्र शासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. या शैक्षणिक धोरणाबद्दल अनेक विचारवंत व विद्वानांनी आपापली मते नोंदवली आहेत. त्यावरून हा आदर्श शिक्षणाचा एक गोंडस आराखडा असल्याचे सर्वांनी सांगितले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र कितपत काटेकोरपणे होईल, याबद्दल सर्वजण साशंक आहेत.
-अशोक केसरकर, इचलकरंजी

गेल्या काही वर्षातील एसएससी व एचएससी म्हणजे दहावी व बारावीचे निकाल पाहता ती वाटचाल १०० टक्केच्या दिशेने द्रूतगतीने जाताना दिसते. इतका गुणांचा फुगवटा असूनही प्रत्यक्षात अशी तथाकथित प्रज्ञावंत मुले पुढे त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात म्हणावी तशी प्रगती करताना दिसत नाहीत. ९० टक्‍क्यांवरील विद्यार्थ्यांची संख्या लाखात पोहोचत असल्याने आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची साडेचार टक्क्यांची जी काही किरकोळ संख्या असेल त्या संख्येसही पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने बहुतेक सर्वजण उत्तीर्ण होत असल्याचे रेकॉर्ड तयार करून शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीस लागल्याचा आभास निर्माण केला जात आहे.
उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणानंतर तरुणांना देश- विदेशात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. अभियांत्रिकी व विशेषतः संगणकीय क्रांतीमुळे अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशातून संगणक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील गुणवंत पदवीधरांना मागणी वाढली. तसेच परदेशातील नव्या संधी प्राप्त करण्यासाठी, एम. एस. करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पालक मुलांना परदेशातील नोकरीचे दरवाजे खुले करून देण्यास मदत करू लागले. आयटीआय, आयआयएमसारख्या संस्थांच्या स्नातकांना मिळणारे गलेलठ्ठ पगार आणि अद्ययावत इंजिनिअर्सना परदेशातील वाढती मागणी यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणाला ‘अच्छे दिन’ आले.
नीट, जेईई, सीईटी, कॅट वगैरे वलयांकीत शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश सुकर करणाऱ्या परिक्षांसाठी शाळा झटू लागल्या. शाळांच्या प्रयत्नांना ‘बाहेरुन पाठिंबा’ देणारी ‘आऊट सोर्सिंग’च्या संस्थांचे सगळीकडे पेव फुटले. राजस्थानातील कोटापासून लातूर पॅटर्नपर्यंत तसेच अनेक नवनवीन इन्‍स्‍टिट्यूट, ॲकॅडमी आणि लर्निंग सेंटर्सच्या पानभराच्या जाहिराती विद्यार्थ्यांना व पालकांना खूणावू लागल्या. भरमसाट पगार देऊन ठेवलेले उच्च शिक्षण प्राध्यापक, चाचणी सरावासाठीच्या नावाखाली पहाटेपासून रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करायला लावणाऱ्या या शैक्षणिक व्यायाम शाळांनी मार्कांची मानाची गदा मळविणारे बलदंड टॉपर्स वर्तमान पत्रातून झळकू लागले आणि पालकांनाही कृतकत झाल्याचे समाधान वाटू लागले. पण पाच-दहा विद्यार्थ्यांची छायाचित्र देऊन हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे या संस्थांचे कसब पालकांबरोबर शिक्षण क्षेत्रातील इतरांनाही लक्षात येईनासे झाले आहे.
उपरोक्त उच्च प्रवेश परीक्षा उत्तीर्ण न झालेल्यांनी गावोगावी तेथील नेतेमंडळींनी आणि शिक्षणप्रेमींनी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये उघडून ‘गंगा आली रे अंगणी’चा दावा करु लागले. त्यामुळे कुठल्या न कुठल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल, याची शाश्वती निर्माण झाली. वैद्यकीय महाविद्यालयांची मर्यादित संख्या व त्यामुळे उपलब्ध जागांची टंचाई यामुळे वैद्यकीयला जाणाऱ्यांच्या एमबीबीएस, डेंटीस्ट, बीएएमएस या अभ्यासक्रमाची आकांक्षा धरणाऱ्यांच्या पदरी निराशाच पडू लागली. त्यामुळे मग बीएएमएस व बीएचएमएस महाविद्यालयांच्याही संस्था खेडोपाडी निघू लागल्या. थोडक्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या या सुळसुळाटामुळे मागणी तसा पुरवठा होऊ लागल्याचे समाधान वाटू लागले तरी शैक्षणिक दर्जाची घसरण प्रत्ययास येऊ लागली. आयटी, संगणकशास्त्र, आयटीसी वगळता इतर शाखांकडे विद्यार्थी वळेनासे झालेत. जे नाईलाजाने उर्वरित शाखा निवडताना त्यांना अपेक्षित कंपन्यातून नोकरी मिळणे दुरापास्त बनत चालले आहे. अभियांत्रिकी पदवी पाठोपाठ पदविका म्हणजे तंत्रनिकेतन किंवा पॉलिटेक्निक विद्यालयांनीही आपले पंख पसरण्यास सुरुवात केली आहे. पण एकंदरीत विद्यार्थ्यांची अनास्था पाहता निवडक विद्यार्थीच या बदलात भरारी घेत असून नामवंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळताना दिसतात.
नव्या शैक्षणिक धोरणांतून प्रथम बालवाडी म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शिक्षणात अंतर्भाव केला आहे. पण बालवाड्या म्हणजे प्राथमिक पर्व शिक्षण एवढेच माफक ज्ञान असलेल्या आणि अक्षर, गजन, वाचनास लवकरात लवकर प्रारंभ करण्याची स्थळे समजून बाल शिक्षणाचा केला जाणारा प्रयोग निश्‍चित स्वागतार्ह नाही. वास्तविक खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी याद्वारे केवळ शाळेतूनच नव्हे तर उघड्या जगातून मूल्य मूल शिकत असते याचा विचार करून मुक्त वातावरणात बालकाचा मेंदू समृद्ध करण्याचा उद्याच्या बालवाड्या या चार-दोन महिन्याचे बालवाडीचे कोर्स करण्याचा शिक्षकांच्या हाती न सोपवता बालमानसाच्या अभ्यास असणाऱ्या व बालशिक्षणाचा खास अभ्यास केलेल्या उच्चशिक्षितांच्या हाती बालके सोपवणे अपेक्षित आहे. हे घडून आले तरच उद्याच्या विद्यार्थ्यास त्यांच्या कलानुसार शिक्षण घेण्याची संधी मिळू शकेल.
एवढेच नव्हे तर नव्या धोरणानुसार केलेली विभागणी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा मागोवा घेऊन त्या त्या टप्प्यावर त्यासाठी योग्य तो मार्ग आखून देईल. तरच तो विद्यार्थी कुवतीनुसार आणि उपजत कौशल्यानुसार अपेक्षित उद्योग व्यवसायात पदार्पण करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवू शकेल. शिवाय महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश परीक्षेनंतर मिळणारा प्रवेश तसेच केंद्र शाळा किंवा संकुल याद्वारे माध्यमिक शिक्षणात कौशल्य-शिक्षणाची उपलब्धता करून दिली जाणारी स्त्रोत किंवा प्रत्यक्षात अमलात येईल तेव्हा खरे, शिवाय आठवीनंतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांना वळवण्याचा प्रयास विद्यार्थ्यांसह पालकांना कितपत रुचेल याविषयी आताच भाष्य करणे आततायीपणाचे होईल.
देशातील शिक्षण क्षेत्रातील वरील सद्यस्थिती पाहिल्यानंतर आपण प्रज्ञावंत विद्यार्थी घडवतोय की परीक्षार्थींच्या झुंडी तयार करून आधुनिक शैक्षणिक कारखान्यातून नव्या जगाला लागणारे हुशार मजूर बनवतोय, असा प्रश्न पडतो. यामुळेच आज आपल्या काही मुलांना विदेशातील सिलिकॉन व्हॅलीतून मागणी असल्याच्या वस्तुस्थितीबद्दल समाधान न मानता मूलभूत शास्त्रातील संशोधन आणि माणूस व संस्कार देणारे शिक्षण भविष्यात देण्याइतपत देशातील शिक्षण संस्था सक्षम होणार का असा प्रश्न पडतो. अन्यथा देशातील शिक्षणाचे वेगाने चाललेले व्यावसायिकरण शिक्षण दिवसेंदिवस महाग करीत चालले असून गरिबांना शिक्षण घेणे परवडेल असे वाटत नाही. देशाच्या आर्थिक उन्नतीचे निकष हे जगातील श्रीमंतात देशातील किती श्रीमंत आहेत, यावरून ठरत असतील तर गरीब व श्रीमंतामधील दरी वाढत जाऊन केवळ प्रस्थापितांसाठीच शिक्षण परवडेल असे वाटते.
दुसरी बाब अशी दिसते की इंग्रजीकरणाच्या दिशेने चाललेली शिक्षणाची फरफट होय. वास्तविक मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांचे आकलन व्यवस्‍थित होवून मुलांना विषयज्ञान होते. ही वस्तूस्थिती असताना केवळ चार वाक्ये इंग्रजी बोलणाऱ्या मुलांचे कौतुक, पिवळ्या गाडीतून जाण्याचा सोस, टाय-बूट घालून आई-वडिलांना पप्पा-मम्मी म्हणून घेण्याची हौस भागवण्यासाठी इंग्रजी शाळांचे फुटत चाललेले पेव आणि आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कोणताही विचार न करता मातृभाषेकडे पाठ फिरवून इंग्रजी शाळांकडे चाललेला लोंढा मूलभूत ज्ञानापासून पुढच्या पिढीला वंचित ठेवणारा कर्दनकाळ ठरेल असे वाटते. अगदी सामान्य कामगार, मोलकरीण किंवा चतुर्थ श्रेणीच्या लोकांनाही आपली मुले इंग्रजी माध्यमात जावीत, असे वाटू लागले आहे. हे जागतिकीकरणापासून निर्माण झालेले नवे व्यसनच म्हणावे लागेल. यामुळे धड मातृभाषा नाही आणि उत्तम इंग्रजीही नाही, अशी त्रिशंकुसारखी स्थिती करून मुलांच्या भवितव्याशी चाललेला अघोरी खेळ वाटतो. हीच वाटचाल राहिली तर पुढील काही वर्षात सरकारी शाळा, मराठी माध्यमिक प्रशाला बंद पडून आपल्या भाषेशी प्रतारणा केली जाऊन ज्ञानभाषेचे माध्यमही हातचे घालवून बसण्याचा धोका संभवतो.
नवे शैक्षणिक धोरण देशाने मंजूर केले असून राज्य सरकारच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. नव्या शैक्षणिक धोरणातील आराखडा आदर्श असला तरी यामधील शिक्षकांचे वेतन, पायाभूत सुविधांवरील खर्च आणि शैक्षणिक संकुलांची उभारणीसाठी आर्थिक तरतूद कशी केली जाणार आहे या विषयी भाष्य नाही. अलीकडील १०० टक्के निकालाची चाललेली स्पर्धा हे बाळसे नसून खून आहे हे जाणून शिक्षण पद्धती, परीक्षा पद्धती आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन करणारा शैक्षणिक कार्यक्रम राबविला तरच मनुष्यबळाचा मोठा देश आणि कष्टकरी प्रज्ञावंतांची भूमी असलेल्या भारत हा शैक्षणिक क्षितिजावर तेजाची किरणे असणारा होऊ शकेल.
------------
एकही आघाडीचे विद्यापीठ नाही
नव्या युगासाठी तांत्रिक अधिकारी आणि डिजिटल जगासाठी संगणकीय संस्काराचे तंत्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉक्टर एवढाच शिक्षणातील केंद्रबिंदू मानून चाललेली शिक्षणाची वाटचाल उद्याच्या जगासाठी वकील, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, लेखक, संशोधक, विचारवंत, तत्त्‍वज्ञानी, सजग राजकीय नेते, खेळाडू, कलाकार, गायक, चित्रकार आणि समाजभान जागवणारे अनेक क्षेत्रासाठीचे व्यवसाय कापराप्रमाणे उडून जाताना दिसताहेत. परिणामी अनेक प्रकारे जीवन एकांगी बनून उपजत गुणांची हत्या केल्याचे पातक शिक्षणतज्‍ज्ञांच्या माथी बसेल अशी भीती वाटते. विश्वाचा गुरू म्हणून आपल्या देशाचा एकविसाव्या शतकात गौरव होत असताना जगातील आघाडीच्या विद्यापीठात देशातील एकाही विद्यापीठाचा समावेश नसावा आणि गेल्या सात-आठ दशकात नोबेल पारितोषिकाच्या क्षमतेचा एकही प्रज्ञावंत देशात तयार होऊ नये, हे विद्यमान शिक्षण पद्धतीमधील अनास्थेचे द्योतक नव्हे काय?

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82278 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..