
मनपा आरोग्य कर्मचारी
पॅकेज उमेदवारीचे पक्षांकडे प्रस्ताव
साट्यालोट्याची चर्चा सुरू; ताकदवान उमेदवारांबाबत सावधगिरी
कोल्हापूर, ता. ३० ः सोडतीनंतर आरक्षित जागा स्पष्ट होताच इच्छुकांनी आपापले प्रभाग निश्चित करत प्रभागातील अन्य उमेदवारांना सोबत घेण्याची बोलणी सुरू केली आहे. काही ठिकाणी तर तीन उमेदवारांनी परस्पर उमेदवारी ठरवली असून, त्यांनी अशा पॅकेजचा प्रस्तावच पक्षांसमोर ठेवण्यास सुरुवात केली आहे. पक्षांनाही त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे ताकदवान उमेदवार हवे असल्याने नेत्यांकडून उमेदवारीचा शब्द देण्यात सावधानता बाळगली जात आहे. काही प्रभागात शेजारील भाग आल्याने मदतीसाठी साट्यालोट्याची बोलणी सुरू आहेत.
तिसऱ्यांदा सोडत झाली असून, मतदार यादीचाही टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आरक्षण निघताच इच्छुक सतर्क आहेत. तीन वगळता सर्व प्रभागात सर्वसाधारण, सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागा आहेत. त्यांची संख्या २६ असल्याने ३५ जागा आरक्षित झाल्या असल्या तरी सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागांवरून निवडणूक लढवण्याची संधी अनेकांना आहे. ओबीसीतील इच्छुकांनाही जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी तयारी सुरू केली आहे.
काही प्रभागांत सर्वसाधारण व ओबीसीची तयारी करून ठेवलेले इच्छुक आहेत. अशांनी एकमेकांना मदत होईल, असे अन्य दोन उमेदवारांशी चर्चा करून ठेवली आहे. त्यांनी आम्ही तिघे उमेदवार असल्याचा पॅकेजचा प्रस्ताव दिले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढतील की स्वतंत्र याबाबत साशंकता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांची मोट बांधली आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीची म्हणूनही तयारी सुरू केली आहे. अनेकांनी तयारी केल्याने थांबण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावाबाबत नेते सावधगिरीने बोलत आहेत. भविष्यात आघाडी की स्वतंत्र हे निश्चित झाल्यानंतरच प्रस्तावांना पुढे चाल दिली जाण्याची शक्यता आहे.
चार सदस्यांबाबतचे पत्र
शिवसेना, भाजप युती सरकारच्या काळात महापालिकांमध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग करून केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. त्यानुसार आताही निवडणूक घेतल्यास सर्व घटकांना फायदा होऊन जनतेची कामे करण्यास सुलभ होईल. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग रचनेचा विषय मंजूर करावा व अधिवेशनात अंतिम मंजुरी घ्यावी, अशा आशयाचे नवीन सरकारमधील एका आमदारांच्या नावाचे पत्र व्हायरल होत आहे. त्यामुळे सरकारच्या पातळीवर त्यादृष्टीने निर्णय होणार का, झाल्यास सध्या ज्या महापालिकांचा निवडणुकीचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे, त्यांच्याबाबत काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82386 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..