सकाळ वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ वर्धापनदिन
सकाळ वर्धापनदिन

सकाळ वर्धापनदिन

sakal_logo
By

३९८४८


‘सकाळ’ वर्धापनदिनाचा आज दिमाखदार सोहळा
४२ वा वर्धापन दिन; माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे व्याख्यान, प्रदर्शनाचेही आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः संस्कृती व परंपरा जपतानाच बदलत्या तंत्रज्ञानाच्या साथीने भविष्याचा वेध घेणाऱ्या आणि त्याचवेळी समाजातील सर्वच घटकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरत, खमकेपणाने लेखणी परजणाऱ्या ‘सकाळ’चा ४२ वा वर्धापन दिन उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वक्ते असून ‘भारतासमोरची सुरक्षिततेची आव्हाने आणि संधी’ या विषयावर ते संवाद साधतील. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाचला मुख्य सोहळा होईल.
दरम्यान, ‘चला, दगड डोक्यात घेऊया’ या प्रदर्शनाचेही आयोजन केले असून, सलग तीन दिवस ते सर्वांसाठी खुले असेल. वर्धापनदिनानिमित्त ‘सुरक्षा’ या विषयावरील विशेषांकही प्रसिद्ध होणार आहे. स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षेपासून देशाच्या सुरक्षितेतपर्यंतच्या विविध विषयांवरील तज्ज्ञांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय, मुख्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम केलेल्या दहा कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा गौरवही होईल. ‘सकाळ’च्या परंपरेप्रमाणे कार्यक्रम नियोजित वेळेतच सुरू होणार असून, सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ’ परिवाराने केले आहे.
गेली चार दशके ‘सकाळ’ने वर्धापन दिनाचे वेगळेपण जपले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे वर्धापन दिनाचा जाहीर सोहळा झाला नव्हता. त्यामुळे यंदाच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक नामवंत वक्त्यांची परंपरा असलेल्या या सोहळ्यात यंदा जनरल मनोज नरवणे संवाद साधणार आहेत. भारताचे २८ वे लष्करप्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. हवाई दलात अधिकारी असलेले वडील मुकुंद आणि आई लेखिका सुधा यांच्याकडून त्यांना देशसेवेचे बाळकडू मिळाले आणि ते पुढे भारतीय लष्कराचा अविभाज्य भाग बनले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. चीनशी संलग्न सुमारे चार हजार किलोमीटर लांब सीमेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली; तर दिल्ली एरिया जनरल ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘ऑपरेशन पवन’ वेळी श्रीलंकेत झालेल्या इंडियन पीस कीपिंग फोर्समध्येही ते सहभागी होते. युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवाया अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले आहे. म्यानमार दूतावासासह आसाम रायफल्सचे उत्तर-पूर्व विभागाचे इन्स्पेक्टर जनरल, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू येथील लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा विविध पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. नागालॅंडमध्ये सेवा बजावताना आलेल्या अनुभवांवर ते सध्या पीएच.डी. करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत सेना पदक, विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकांसह लष्करप्रमुखांकडून विशेष पदकाने त्यांचा गौरव झाला आहे. एकूणच, त्यांच्या संवादातून भारताच्या सुरक्षिततेविषयी सर्वांगीण मंथन घडणार आहे.

असे होतील कार्यक्रम...
- सायंकाळी ५ ः ‘चला, दगड डोक्यात घेऊया’ प्रदर्शनाचे उद्‍घाटन
- सायंकाळी ५.३० ः मुख्य सोहळा, दहा कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा गौरव
(सर्व कार्यक्रम संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होतील. मुख्य सोहळ्यानंतर परंपरेप्रमाणे स्नेहमेळावा होईल.)


बी न्यूज, ‘एसपीएन’चे विशेष सहकार्य
माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या व्याख्यानाची पर्वणी अधिकाधिक लोकांना घेता यावी, या उद्देशाने बी न्यूज व ‘एसपीएन’ने लाईव्ह प्रसारणासाठी विशेष सहकार्य दिले आहे. सायंकाळी साडेपाचपासून सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण बी चॅनेलच्या ५२२ क्रमांकाच्या चॅनेलवरून तर ‘एसपीएन’च्या ७२ क्रमांकाच्या चॅनेलवरून होणार आहे.

‘सकाळ’च्या फेसबुक पेजवरूनही लाईव्ह प्रसारण होणार असून, त्यासाठी खालील क्यूआर कोड सर्च करा...
क्यूआर कोड- ३९८६२
..............
की ः सत्कारमूर्ती व प्रदर्शनाविषयी सविस्तर ः पान....वर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82689 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top