ग्रामविकास पुरवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामविकास पुरवणी
ग्रामविकास पुरवणी

ग्रामविकास पुरवणी

sakal_logo
By

ग्रामगीता ः गावांच्या परिपूर्ण विकासाची मार्गदर्शिका
- भारत पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

लीड
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता म्हणजे सोप्या भाषेत ओव्यारुपी अर्थपूर्ण लिहिलेला ग्रंथ. यात तुकडोजी महाराजांच्या अध्यात्मिक व सामाजिक आणि वैचारिक उंचीचे दर्शन घडते. ग्रामगीता जाणून घेण्यापूर्वी तुकडोजी महाराज यांचे थोडक्यात जीवन चरित्र अवलोकन करणे गरजेचे आहे.

तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ ला अमरावती जिल्ह्यात यावली गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी व आईचे नाव मंजुळादेवी. घरची परिस्थिती गरिबीची होती. बालवयात त्यांनी पोहणे, कुस्ती, अश्वारोहण या कला अवगत केल्या होत्या. त्यांचे बालपणीचे नाव हे माणिक होते. पुढे ते आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रसंत तुकडोजी म्हणूनच नावारुपाला आले.
बालपणातच त्यांना मातेबरोबर गृहत्याग करावा लागला होता. वरखेड क्षेत्री त्यांना नाथपंथी संत आडकोजी महाराज यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या मार्गदर्शनाने तुकडोजी यांचे खरे अंतरंग फुलले होते. गुरू आज्ञेमुळे तुकडोजी सामाजिक व अध्यात्मिक विषयावर स्वकाव्य रचू लागले, गाऊ लागले होते. १९२१ मध्ये शतायुषी आडकोजी महाराज समाधिस्त झाले. गुरूच्या विरहाने व्याकूळ तुकडोजी विनातिकीट धक्के खात खात पंढरपूरला पोहोचले होते. तिथे भक्त पुंडलिकाच्या मातृ-पितृ भक्ती आदर्शाने ते परत यावकीला पोहोचले. आईच्या इच्छेसाठी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. चरितार्थासाठी तुकडोजी शिवणकाम करीत होते. परंतु, काही काळातच गुरूभक्ती व ईश्वर दर्शनाची उत्कंठता त्यांच्या मनात प्रबळ झाली. त्यांनी शिवणयंत्र विकून ते पैसे दान-धर्म केले व रामटेकच्या जंगलात साधनेसाठी गेले. तेथील साधने वेळी त्यांना जंगलात एका महान महायोगी तपस्वीचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर तुकडोजी महाराज नागपूरला ताडोबा टेकडी येथे साधनेसाठी फिरत राहिले. सालबर्डी, रात्रदिघी आणि गोंदाडा या घनदाट जंगलात त्यांनी बराच काळ व्यतित केला. सामाजिक व राजकीय प्रश्‍नावर त्यांनी प्रगल्भ व स्पष्ट मते मांडली. त्यांचा सामाजिक व खेड्यांचा विकास याकडे ओढा होता. त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. ‘१९४१ च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता. त्यांना इंग्रजांनी अटक केली होती. नागपूर व रायपूर येथे त्यांना तुरुंगात कैदी म्हणून ठेवले होते. मोझरी या गावी त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली आहे. हा आश्रम म्हणजे मानवतेचे प्रतीक आहे. येथे सर्व धर्म पंथांच्या लोकांना या मंदिराचे दरवाजे अहोरात्र खुले आहेत. बंगाल येथील दुष्काळ (१९४५) चीन युद्ध व पाकिस्तान युद्ध (१९६५) कोयना भूकंप यामुळे उडालेल्या हाहाकारामुळे तुकडोजी महाराज तेथे संकटकाळात मदत करण्यासाठी तत्पर गेले होते.’ ‘आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सुद्धा (१९५५) मध्ये महाराज सहभागी झाले होते.
जपान येथील विश्वपरिषदेत महाराजांनी मार्गदर्शन केले होते. राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल केली. तुकडोजी महाराज यांनी अनेक साहित्य व ग्रंथ लिहिले. ग्रामगीता, सार्थ आनंदामृत, सार्थ आत्मप्रभाव, गीताप्रसाद, बोधामृत हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुकडोजी महाराज यांनी ग्रामीण भागाच्या पुनर्निर्माणावर लक्ष केंद्रित केले होते. यासाठी त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला पाहिजे, तरच राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा होती. समाजातल्या सर्व थरातील लोकांचा उद्धार कसा होईल, ग्रामउन्नती व गावाचे कल्याण कशाने साधेल हे त्यांचे स्वप्न होते. आपल्या देशातील खेड्यांची स्थिती कशी आहे, याची त्यांना जाण होती. यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या समस्यांचा मूलभूत विचार केला होता. या समस्या प्रत्यक्षपणे कशा सोडवाव्यात यावरही उपाय महाराजांनी सुचविले होते. यासाठी त्यांनी ४१ अध्याय असलेली अत्यंत सोप्या भाषेत ग्रामगीता ग्रंथाची लेखणी केली. आजही आधुनिक भारताच्या विकासासाठी ही एक संजीवनी लाभली आहे.
‘उगीच जगाच्या गप्पा करण्यापेक्षा माझा देश व माझा गाव याकडेच सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे’, असे त्यांचे मत होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने खरंच ‘ग्रामगीता’ ग्रंथ वाचला तर पाहिजेच व कृतीदेखील केली पाहिजे, तरच गावांचा परिपूर्ण विकास होऊ शकतो.

‘गाव हा विश्‍वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा
गावची भंगता अवदशा येईल देशा...’
गाव हादेखील विश्‍वाच्या नकाशाप्रमाणे आहे. गावाचा विकास खुंटला तर देश बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही.
जाणावे ग्राम हेची मंदिर । ग्रामातील जन सर्वेश्‍वर सेवा हेची पूजा समग्र । हाची विचार निवेदावा...
आपला गाव हेच मंदिर हे गावात राहणारे सर्व लोकजन हेच ईश्‍वराचे रूप आहेत. त्यांची सेवा व त्यांचा परिपूर्ण सर्वांगीण विकास हीच खरी पूजा आहे. हीच खरी ईश्‍वर सेवा आहे.
मी समजतो गावही शरीर । त्यास राखावे नेहमीच पवित्र
त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गावी ।।
कागदी पुस्तकात, काव्यात । खेड्यांचे वर्णन दिल्या बहुत
परिवस्तुस्थिती पाहता तेथे । क्षणभरीही राहवेना ।।
जैसे आपण स्नान करावे । तेसे गावही स्वच्छ ठेवीत जावे ।
सर्वची लोकांनी झिजूनी घ्यावे । श्रेय गावाच्या उन्नतीचे ।।
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे ।
आपुले ग्रामाचे गोजिरे करावे । शहराहूनी ।
अशा सोप्या भाषेत ग्रामविकासाला मार्गदर्शक ठरू शकेल. आपल्या गावखेड्यांचा सर्वांगीण विकास होईल, अशी ग्रामगीता खरंच अत्यंत वाचनीय व अर्थपूर्ण आहे. सरपंच व सदस्य व ग्रामसेवकांनी गावागावांत प्रत्येत घरांत ग्रामगीतेचे जागरण करण्याची आवश्‍यकता आहे. स्वच्छता, पर्यावरण, पाणी, शेती, संस्कार, पारदर्शकता गावांचा विकास आराखडा, गावांचे आरोग्य अशा अनेक बाबींना ग्रामगीतेतून आपणाला या समस्या सोडविता येतील. सरपंच मित्रांनो व सर्व जिल्हा परिषद व पं. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली गावे आपला तालुका व आपला जिल्हा आपणालाच आदर्श बनवावा लागणार आहे. फक्त राजकारणच डोक्यात ठेवून आज गावांचा विनाश होत आहे. म्हणून निदान आता तरी जागे होऊया.
कोल्हापूरची माती - कोल्हापुरी ठसका, कोल्हापुरी आदर्शवाद - पुरोगामित्व आपल्या जिल्ह्यातील सर्व गावे IDEAL व्हावीत, सुंदर व्हावीत - समृद्ध व्हावीत हे कृतिशील स्वप्न ग्रामगीता डोळ्यासमोर ठेवून हाती घेऊया व पुन्हा एकदा सगळ्या भारत देशाला दाखवून देऊया.
‘आम्ही कोल्हापुरी लै भारी’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82870 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top