दहीहंडी विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडी विषय
दहीहंडी विषय

दहीहंडी विषय

sakal_logo
By

संग्रहित छायाचित्र
82828

यंदा कोण लावणार ‘चौका’?
उत्सुकता शिगेला, दहीहंडीला साहसी खेळाच्या दर्जासाठी होणार मागणी
संभाजी गंडमाळे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः कोरोनामुळे दोन वर्षे न रंगलेला दहीहंडीचा थरार यंदा रंगणार आहे. कोल्हापूरचाच विचार केला तर ‘ट्रिपल एक्का’ लावून दहीहंडीचा अचूक वेध यशस्वी झाला आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात मात्र ‘चौक्या’सह दहीहंडी फोडण्याचा निर्धार काही पथकांनी केला आहे. यापूर्वी प्रयत्न झाला असला तरी तो यशस्वी होऊ शकला नव्हता. या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदा कोणते पथक ‘चौका’ मारणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दरम्यान, राज्य शासनानेही यंदा दहीहंडीदिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळावा, ही मागणी जोर धरणार आहे. १९ ऑगस्टला सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून हा थरार अनुभवायला मिळणार आहे.
-
प्रवास दहीहंडीचा...
गोकुळष्टमीला ‘दहीहंडीचा दिवस’ केला, तो कोकणातल्या बाल्यांनी. सुरुवातीला केवळ शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी एकत्र येऊन खेळण्याचा हा खेळ हळूहळू गल्लीत, गावांत आणि नंतर तो राज्यातील प्रमुख उत्सवच बनला. कॉर्पोरेट युगात तर हा उत्सव आता अधिकच भव्य झाला. मुंबईमध्ये होणाऱ्या अतिभव्य दहीहंडी हे त्याचे उदाहरण असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी ही कोल्हापुरातच होते.
दहीहंडीचा उत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने एक ‘टीम स्पिरीट’ असते आणि त्यामुळेच त्याला मिळणारा प्रतिसादही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात १२ वर्षाखालील गोविंदाला दहीहंडी फोडण्यास आणि २० फुटावर दहीहंडी बांधण्यावर निर्बंध आले. सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा हा थरार सुरू झाला. पण, पुन्हा कोरोनामुळे दोन वर्षे प्रतीकात्मक उत्सव साजरा करावा लागला. एका पथकाच्या माध्यमातून किमान दीडशे ते तीनशे गोविंदा एकवटतात आणि महिनाभर अगोदर कसून सराव करतात. यंदाही कालच नागपंचमीच्या मुहूर्तावर बहुतांश पथकांनी सरावाला प्रारंभ केला आहे.

काय आहे ट्रिपल एक्का?
प्रत्येक पथकाने सलामी दिल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा थरार रंगतो. चौथ्या थरानंतर एकावर एक असे तीन गोविंदा उभारून मनोरा रचणे आणि दहीहंडी फोडणे याला ‘ट्रिपल एक्का मारला'', असे म्हणतात आणि चौथ्या थरानंतर एकावर एक असे चार गोविंदा उभे राहून दहीहंडी फोडली, तर त्याला ‘चौका मारला'', असे म्हणतात. कोल्हापूरच्या उत्सवाचा विचार केला तर सात ते आठ पथके ‘ट्रिपल एक्का'' मारण्यात तरबेज आहेत. मात्र, ‘चौका'' मारण्यात अद्यापि कुणाला यश आलेले नाही. त्यासाठी काही पथकांनी मुंबईतील गोविंदा पथकांकडे जाऊनही प्रशिक्षण घेतले आहे.

कोट
दोन वर्षे आम्हाला प्रतीकात्मक दहीहंडी साजरी करावी लागली. पण, यंदा साऱ्यांच्यात सळसळता उत्साह असून सरावाला प्रारंभ झाला आहे. या रांगड्या खेळाला साहसी खेळ म्हणून सन्मान मिळावा, ही अनेक वर्षांची मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरणार आहे.
- सत्यजित गुरव, अजिंक्यतारा पथक, शिरोळ

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळावा म्हणून अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, ती अजूनही प्रलंबित आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय होईल, ही अपेक्षा आहे. सर्वाधिक हंड्या फोडणे, हेच आमचे यंदाचेही ध्येय आहे आणि ते पूर्ण करू.
- संतोष अवताडे, शिवगर्जना पथक, तासगाव

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83446 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..