इचल: स्वछतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: स्वछतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात
इचल: स्वछतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात

इचल: स्वछतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात

sakal_logo
By

स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात
नागरिकांची गैरसोय; मोजकीच शिल्लक; फायबरची हॉकी मैदानात पडून
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.३ ः इचलकरंजी महापालिका प्रशासनांकडून उघड्यावर शौचास बसणे, लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदींवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. शहराचे आरोग्य व शिस्त यासाठी ही कारवाई महत्त्वाची आहे, मात्र यासाठी योग्य अशी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या शहरात स्वछतागृह दाखवा व बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती आहे. त्यातच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत शिल्लक असलेली स्वछतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेली आहेत. महिला स्वछतागृहे खरेदी केली असल्याचे सांगण्यात येते, मात्र बसवलेली दिसत नाहीत. त्यामुळे शहरवासीयांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शहरात मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने शहरात येत असतात. दररोज सुमारे २५ हजारहून अधिक नागरिक विविध कामांसाठी शहरात येत असल्याने शहर नेहमी गजबजलेले असते. त्यांना शहरामधील स्वच्छतागृहे शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शहरात कागदोपत्री ८६ स्वछतागृहे असल्याची नोंद आहे, मात्र ती शोधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काहींना अडचणीची ठरणारी स्वछतागृहे रात्रीतून गायब झाली आहेत. तेथे पुन्हा स्वछतागृहे बांधण्याची तसदी महापालिका प्रशासनाने घेतली नसल्याचे दिसते. परिणामी सध्या शहरात स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी असून, त्यांची अवस्थाही अत्यंत खराब आहे.
हॉकी मैदानामध्ये सुमारे २७ लाखांची फायबरची स्वच्छतागृहे अनेक महिने पडून होती. वेळीच बसवली नसल्याने उन्हाच्या माऱ्‍यामुळे खराब झाली. शहर स्वछ ठेवताना नियम मोडणाऱ्‍या नागरिकांवर कारवाई होणे गरजेचे आहे; पण त्याचबरोबर नागरिकांची कुचंबणा होऊ नये याचीही खबरदारी महापालिका प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. शहरात अनेक ठिकाणी पे अँड यूज शौचालये आहेत, मात्र शहराबाहेरील नागरिक आल्याचे दिसताच त्यांच्याकडून लघुशंकेसाठी पैशांची मागणी होते. अशा घटना घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
-------------
शासकीय कार्यालयांमध्येही गैरसोय
इचलकरंजी शहरांमध्ये वीसहून अधिक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कामानिमित्त येत असतात, मात्र यामधील अधिकतर कार्यालयांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
---
नागरिकांना दंडाचा फटका
२०१७-१८ मध्ये पालिकेने स्वच्छतागृहांच्या स्वछतेसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या वाहनाचे वार्षिक टेंडर २७ लाखांचे दिले होते. त्यास मुदतवाढही दिल्याचे समजते; परंतु कर्मचारी स्वच्छतागृहे कधी स्वच्छ करतात, हे मात्र शोधावे लागत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83617 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..