
पाऊस ३ जुलै २०२२
40628
40632
शहरात पावसाचा धुल्ल्या..!
--
दोन तास झोडपले; नेहरूनगरात नारळाच्या झाडावर पडली वीज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शहारात आज सायंकाळी मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. दुपारी चारनंतर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट झाला. दोन तास झालेल्या पावसाने अनेक रस्त्यावर पाणी साचले. काही वेळ वाहतूक खोळंबा झाला. पावसाने शहरात जनजीवन ठप्प झाले. नेहरूनगर येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यामुळे झावळ्यांनी पेट घेतला. आग वाढण्याची शक्यता असतानाच नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे अनर्थ टळला.
अचानक झालेल्या पावसाने मध्यवर्ती बस स्थानक, परीख पूल, राजारामपुरी जनता बझार परिसर, उद्योग भवन परिसर, पार्वती मल्टिप्लेक्स परिसर, धान्यलाईन परिसरात रस्त्यावर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली. रेड्याची टक्कर ते सुभाषनगर मार्गावरील शास्त्रीनगर येथील पुलावर पाणी साचून राहिल्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना पाण्यातून प्रवास करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालय येथील असेंब्ली रोडवर पाणी असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली.
वीज नसल्यामुळे ताराराणी पुतळा येथील सिग्नल बंद झाला. तेथे वाहतूक कोंडी झाली. टाकाळा ते राजारामपुरी जनता बझार चौकापर्यंत रस्त्याच्या बाजूला पाणी साचून राहिले. मार्केट यार्ड परिसरात माल वाहतूकधारकांना थांबून राहावे लागले. मुसळधार पाऊस असल्यामुळे त्यांना मालाची चढ-उतार करणेही शक्य होत नव्हते. मार्केट यार्ड येथून काही वाहनधारक लक्ष्मीपुरी धान्यओळीकडे जाण्यासाठीही थांबून होती.
परीख पुलाखालील
प्रवास गटारीतूनच...
मुसळधार पावसानंतर बाबूभाई परीख पुलाखालून जीवमुठीत घेऊनच वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना पुढे जावे लागत होते. ड्रेनेजच्या पाण्यातूनच वाट काढत होते. सुमारे दीड-दोन फुटांच्या गटारीच्या पाण्यातून वाहनधारक पुढे जात होते. अजून किती दिवस असे काढायचे? येथील जवळून पर्यायी मार्गच नसल्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना परीख पुलाखालील गटारीतूनच प्रवास करीत असल्याचे आज जाणवले.
---------------
शालेय विद्यार्थ्यांचे हाल
दुपारी चारपासून सायंकाळी सहापर्यंत मुसळधार होता. शाळा सुटल्यावर शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक पालक दुचाकीवरून भिजत विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जातानाचे चित्र शहरात होते. काही विद्यार्थी रेनकोट घालून तर काही विद्यार्थी छत्र्यांघेवून जाताना दिसत होते.
महाद्वार झाला शांत...
मुसळधार पाऊस असल्यामुळे फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद केले. महाद्वार रोडवरील ग्राहक ही कमी झाला. सायंकाळी सातनंतर रिमझिम पाऊस सुरू असला तरीही पर्यटकांसह गर्दी कमी झाली. मुसळधार पावसाने महाद्वार शांत झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83642 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..