ग्रामविकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामविकास
ग्रामविकास

ग्रामविकास

sakal_logo
By

भौतिक सुविधांतून गावांचा विकास

- युवराज पाटील

लीड

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध’ हे उद्दिष्ट ठेवून पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास करता येणे शक्य आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळविणे. पर्यावरणाचे भान ठेऊन भौतिक सुविधा उपलब्ध करणे व इको व्हिलेजची संकल्पना राबवून समृध्द ग्राम निर्माण करणे गरजेचे आहे. गावांच्या भौतिक विकासाच्या सार्वजनिक योजना आणि मानव विकासाच्या शाश्‍वत ग्राम विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या योजना व उपक्रम, प्रकल्प यांचा समावेश असणारा आराखडा म्हणजे ग्रामविकासाचा संपूर्ण आराखडा.
- प्रतिनिधी


ग्रामविकासामध्ये शाश्‍वत विकास हा शब्द सातत्याने वापरला जातो. अगदी जागतिक पातळीपासून ते ग्रामपंचायतींचा विकास आराखडा करण्यापर्यंत या शब्दाचा वापर करण्यात येतो. मात्र शाश्‍वत विकास म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ काय? जगात, राष्ट्रीय पातळीवर, राज्याच्या संदर्भात तसेच जिल्हा, तालुका व गावांच्या पातळीवर शाश्‍वत विकास करायचा म्हणजे काय करायचे ? शाश्‍वत विकास ध्येय लक्षात घेऊन ग्रामविकास आराखडा तयार करण्याबाबत अनेक ठिकाणी चर्चा होते, तसेच शासनाकडून आदेश दिले जातात. पण शाश्‍वत विकास म्हणजे काय?
शाश्‍वत विकास याचा साधा अर्थ आहे टिकाऊ विकास. तात्पुरत्या लाभाचा केवळ भौतिक सुविधा वाढवून पैशाच्या लोभाच्या हव्यासापोटी केला जाणारा व नैसर्गिक संसाधनांना ओरबाडणारा आणि त्यांचे कायमचे नुकसान करणारा विकास हा शाश्‍वत विकास नसतो. थोडक्‍यात सध्याच्या पिढ्यांच्या (आपल्या) गरजा भागविताना पुढच्या पिढ्यांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी संसाधने (जल, जंगल, जमीन, पर्यावरण) शिल्लक राहतील, अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करणे म्हणजे शाश्‍वत विकास होय.

आराखडा तयार करताना शाश्‍वत विकासाचा विचार कसा करावा?
गावाच्या शाश्‍वत विकासाचा विचार करताना गावाच्या सर्वेक्षणातून गावाच्या संसाधनांची जी माहिती मिळाली आहे, त्याचा प्रथम विचार करावा लागेल. त्यामध्ये गावास उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती (जल, जंगल, जमीन व पर्यावरण) तसेच मानवी साधनसंपत्ती यांचा विचार करावा.
सध्या उपलब्ध असलेली जमीन, पाणी, वने यांना सुरक्षित ठेवून त्यांची गुणवत्ता म्हणजेच जमिनींची उत्पादकता, पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्ध वनक्षेत्र यांबाबत दक्ष राहून त्यांची पुढील पिढ्यांसाठी जपणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या उपयोगितेत व गुणवत्तेत सुधारणा करण्याचे उपाय योजना, सौर, पवन व जैविक ऊर्जेचा उपयोग वाढविणे म्हणजेच गावाच्या शाश्‍वत विकासाचा विचार करणे होय.
संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या सभासद राष्ट्रांसाठी ‘शाश्‍वत विकास ध्येये २०३०‘ असा एक आराखडा सप्टेंबर २०१५ मध्ये तयार केला. त्यामध्ये जगातल्या सर्वच देशांनी शाश्‍वत विकासाची एकूण १७ ध्येय २०३० पर्यंत पूर्ण करायची आहेत असे ठरविण्यात आले आहे. शाश्‍वत विकासाची ही सतरा ध्येये कोणती आहेत? दारिद्र निर्मूलन, भूकमुक्त समाज, चांगले आरोग्य व स्वास्थ्य गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंगभाव समानता, स्वच्छ व सुरक्षित पाणी, परवडणारी व हरित ऊर्जा (सौर, पवन, जैव), रोजगार व आर्थिक प्रगती, उद्योग, संरचना, विषमता कमी करणे, शाश्‍वत शहरे व समाज, वातावरण बदलावर कृती, पाण्याखालील जीवन सुरक्षा, जमिनीवरील जीवन सुरक्षा, न्याय व शांतता, सर्वसमावेशक विकास व त्यासाठी संस्थात्मक भागीदारी, अशी ध्येये ठरविण्यात आली आहेत. गावपातळीवर ही ध्येये साध्य करण्यासाठी काय करायला हवे?
गावाच्या शाश्‍वत विकास साध्य करण्यासाठी दोन पातळ्यांवर प्रयत्न व्हावे लागतील. प्रथमतः गावाच्या विकास कार्यासाठी भौतिक सुविधाही निर्माण कराव्या लागतील, त्यामध्ये सार्वजनिक उपयोगाच्या बाबी असतील. यामध्ये सार्वजनिक संस्था, इमारती, रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्याच्या सुविधा यांचा समावेश आहे.
कोणताही विकास हा माणूस घडवून आणतो. म्हणून मानवाचा विकास हाही महत्त्वाचा असतो. मानव विकास निर्देशांकात सुधारणा होण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व उपजीविका या क्षेत्रातील उपक्रम व शाश्‍वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी दारिद्र निर्मूलन, लिंगभाव समानता, स्वच्छ व सुरक्षित पाणी, स्वच्छता, शांतता, न्याय, सर्वसमावेशक विकास, समानता, उद्योजकता, मूलभूत सुविधा, शिक्षण प्रशिक्षण इ. बाबींवर विकास आराखड्यात भर द्यावा.

ग्रामपंचायतीस सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न, स्वनिधी व शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांकडून वेगवेगळ्या योजनांमधून प्राप्त होणारा निधी, गावास मिळणारी बक्षिसे, लोकवर्गणी, उद्योगांकडील सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधी या सर्वांचा विचार करून त्यावर आधारित गावांच्या भौतिक विकासाच्या सार्वजनिक योजना आणि मानव विकासाच्या शाश्‍वत ग्राम विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या योजना व उपक्रम, प्रकल्प यांचा समावेश असणारा आराखडा म्हणजे ग्रामविकासाचा संपूर्ण आराखडा होय. ग्रामविकासासाठी संपूर्ण आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वित्त आयोगाच्या निधीशिवाय ग्रामविकासासाठी शासनाच्या विविध विभागाकडून निधी मिळतो, तो मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वित्त आयोगाच्या हक्काच्या निधीशिवाय ग्रामपंचायत किमान बारा विभागांकडून गावाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या (१८३ योजना) योजनाद्वारे निधी मिळवू शकते. त्यामध्ये ग्रामपंचायत विभाग (१६ योजना), महिला व बालकल्याण विभाग (८ योजना), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (१४ योजना), पशुसंवर्धन विभाग (१३ योजना), शिक्षण विभाग (३९ योजना), कृषी विभाग (१९ योजना), आदिवासी विभाग (१२ योजना), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (७ योजना), ग्रामपंचायत प्रशासन विभाग (९ योजना), समाज कल्याण विभाग (७ योजना), आरोग्य विभाग (३० योजना), कौशल्य विकास विभाग (६ योजना).
पंचवार्षिक विकास आराखडा तयार केल्यानंतर दरवर्षी ग्रामविकास आराखडा तयार करताना राज्य व केंद्र शासनाच्या या विविध योजनांचे अभिसरण करून ग्रामपंचायतींनी गावाच्या शाश्‍वत ग्रामविकासाचे आराखडे तयार करून त्याची प्रामाणिक व पारदर्शकपणे अंमलबजावणी केल्यास, शाश्‍वत व समृद्ध गाव आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.


जिल्ह्यामध्ये १२ तालुके असून त्याअंतर्गत १०२५ ग्रामपंचायती आहेत. १०२५ ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरिता ग्रामसेवकांची ७१० पदे मंजूर असून ५७६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्यांची १९३ पदे मंजूर असून १७१ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. रिक्त पदे २२ भरणे आहे. विस्तार अधिकारी (पंचायत) यांची ४२ पदे मंजूर असून ४१ विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत. रिक्त पदे १ भरणे आहे. ग्रामसेवकाची ७१० पदे मंजूर असून ६९६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. रिक्त पदे १४ भरणे आहे.

कोट
शाश्वत विकासासाठी लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने एकत्रित काम करणे गरजेचे आहे.
डॉ. सुजित मिणचेकर, संचालक गोकुळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84517 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..