
गुंठेवारी नियमितीकरणात एजंटगिरी नको ः सेतज पाटील.
४१२८६
गुंठेवारी नियमितीत एजंटगिरी नको
आमदार सतेज पाटील; थेट पाईप योजनेसह, अमृतचा घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः गुंठेवारी नियमितीकरणाबाबतची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत गेली पाहिजे. याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था लावा. प्राधान्याने या प्रस्तावावांवर कार्यवाही करा. असे झाले नाही तर गुंठेवारी नियमितीमध्ये एजंटगिरी सुरू होते. त्याचा नागरिकांना त्रास होतो. यामध्ये एजंटगिरी सुरू होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी प्रशासनाला केली. महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सुरुवातीला थेट पाईपलाईन योजनेतील प्रगतीचा आढावा घेतला. जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही परवानग्यांच्या प्रलंबिततेबद्दल त्यांनी सांगितले. याबाबत पुढील बैठकीत त्यांना बोलावून सगळे प्रश्न सोडवू असे सतेज पाटील यांनी सांगितले. त्यानंतर गुंठेवारीच्या नियमितीकरणाबाबत विचारले नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन म्हणाले, ‘‘याबाबतची जाहिरात आज वर्तमानपत्रात आलेली आहे. आजपर्यंत १४ हजार ९८० प्रकरणे आली होती. त्यातील ९ हजार ४८० अर्ज निर्गत केली.’’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘अधिकाधिक लोकांपर्यंत गुंठेवारी नियमितीकरणाबाबतची माहिती जाण्यासाठी प्रशासकांनी व्हिडीओ करून तो पाठवला पाहिजे. गुंठेवारीच्या नियमितीकरणाचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारा. तेथे दोन अभियंत्यांची नियुक्ती करा. अर्ज स्वीकारतानाच कागदपत्रे तपासून घ्या. कागदपत्रात त्रुटी असतील तर त्याची पूर्तता करूनच प्रस्ताव स्वीकारा. प्रत्येक प्रस्तावाला टोकन नंबर द्यावा. वशिल्याचे आधी बाकीचे नंतर असे करू नये. प्रस्ताव येईल तसे त्याची निर्गत करावी. पहिला येईल त्याला प्राधान्य याप्रमाणे काम करावे. याबाबत सर्वेअरची बैठक घेऊन त्यांनाही भाग वाटून द्यावेत.’’
रस्त्यांच्या पॅचवर्कबाबत ते म्हणाले, ‘‘याबाबतचे टेंडर काढले आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे प्राधान्यांने करून घेतले जातील. त्यानंतर बाकीचे पॅचवर्क केले जाईल. पाऊस कमी झाला की पुढील काम सुरू होईल.’’
बैठकीला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त संजय देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, उपअभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक हे उपस्थित होते.
जोशीनगरचा लेआउट करा
बैठकीत माजी महापौर उदय साळोखे यांनी सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीच्या जागेचा टीडीआर जागा मालकाला द्यावा व जागा महापालिकेच्या नावाने करून घ्यावी. येथील नागरिकांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड द्यावे अशी मागणी केली. याबाबत न्यायालयाचे आदेश असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर नगररचना सहाय्यक संचालक महाजन म्हणाले, ‘‘या जागेवर कोणतेही बांधकाम झालेले नाही. त्यामुळे टीडीआर देता येत नाही.’’
त्या कंत्राटदारावर कारवाई का नाही?
अमृत योजनेच्या कामाचा आढावा घेताना आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘वर्षभरापासून अमृत योजनेचे काम ठप्प आहे. मात्र त्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट हा केले नाही. मी गेल्या वर्षीपासून हेच सांगत होतो. आता हे काम थांबले आहे. त्याला कोण जबाबदार?’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84700 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..