
पाऊस ६ ऑगस्ट २०२२
पंचगंगेच्या पातळीत संथ गतीने वाढ
जिल्ह्यात १८.९ मिमी पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग केला कमी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ - गेली दोन दिवस सुर झालेल्या जोरदार पावसाने पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सायंकाळपासून तासाला दोन इंचाने पाणीपातळीत वाढ होत आहे. रात्री नऊ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १५ फूट दोन इंच इतकी होती. सर्वसाधारण पणे १६ फुट पातळी झाल्यावर बंधारा पाण्याखाली जात असल्याचे आजपर्यंतची आकडेवारी सांगते. जिल्ह्यात सकाळी आठपर्यंत रुई, इचलकरंजी दोनच बंधारे पाण्याखाली होते. रात्री आठ वाजता यामध्ये शिंगणापूर बंधाऱ्याचाही समावेश झाला. त्यामुळे रात्री नऊपर्यंत जिल्ह्यातील तीन बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतुक बंद करून पर्यायी मार्गाने सुरू केली आहे. २०१९ला आजच्याच दिवशी शहरात महापुराची स्थिती निर्माण झाली होती.
तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली आहे. त्यामुळे सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोविस तासांत जिल्ह्यात सरासरी १८.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५२.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणात ६.४८ टीएमसी पाणीसाठा असून ते ७७.५५ टक्के भरले आहे. राधानगरी धरणातील विसर्ग आता कमी केला असून तो केवळ २०० क्युसेक्स विसर्ग आता सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांतील साठा दलघमीमध्ये ः राधानगरी १७४.९२, तुळशी ७८.४९, वारणा ७७९.७६, दूधगंगा ५०४.३०, कासारी ५९.४४, कडवी ६०.२४, कुंभी ५६.२७, पाटगाव ८४.१४, चिकोत्रा ३५.६०, चित्री ४९.६३, घटप्रभा ३६.४०, आंबेआहोळ ३०.९८ जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
बंधाऱ्यांवरील पातळी फुटांत ः राजाराम १३ , सुर्वे १६.२ , रुई ४२.४, इचलकरंजी ३९, तेरवाड ३७.३, शिरोळ २७.९, नृसिंहवाडी २७.८, राजापूर १२.३
जिल्ह्यात २४ तासात झालेला तालुकानिहाय पाऊस मिमीमध्येगः हातकणंगले- ४.५, शिरोळ- ४.२, पन्हाळा- १०.२, शाहूवाडी- २४.७, राधानगरी- ३०.२, गगनबावडा- ५२.९, करवीर- ७.४, कागल- १६.८, गडहिंग्लज- १७.५, भुदरगड- ५१.९, आजरा- ३५.८, चंदगड- २३.४. असा एकूण सरासरी १८.९ मिमी पाऊस झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84787 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..