वृंदा करात व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृंदा करात व्याख्यान
वृंदा करात व्याख्यान

वृंदा करात व्याख्यान

sakal_logo
By

41328
४१२९३

सत्तेचा दुरुपयोग करणारे राष्ट्रवाद शिकवतात
मार्क्सवादी नेत्या वृंदा करात; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माकपतर्फे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘‘सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या शक्ती आज देशवासीयांना राष्ट्रवाद शिकवत आहेत. देशभक्तांना धर्म विचारत आहेत. हिंदुत्वाची विचारधारा आणि देशभक्ती या दोन्ही परस्परविरोधी बाबी आहेत. धर्माची बाब पुढे करून पुन्हा देशात भेदाची दरी निर्माण करीत आहेत. संविधानाचे अधिकार नाकारले जात आहेत. या विरोधात सर्वांनी आवाज उठवणे, देशाची एकसंधता अबाधित राखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे’’, असे मत माजी खासदार, मार्क्सवादी नेत्या वृंदा करात यांनी आज येथे केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्य योगदान आणि देशासमोरील आव्हाने’ या विषयावर त्या बोलत होत्या. ऊस तोडणी मजुरांचे नेते डॉ. सुभाष जाधव अध्यक्षस्‍थानी होते.
श्रीमती करात म्हणाल्या, ‘‘ब्रिटिशांनी दीडशेवर वर्षे भारतीयांवर राज्य केले. त्यांच्या ताब्यातून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी देशवासीयांनी शंभर वर्षे संघर्ष केला, तसे देशातील सर्वसामान्य कष्टकऱ्यांपासून ते क्रांतिकारकांनी बलिदान दिले. अनेकजण फासावर गेले. तुरुंगवास भोगला, त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. जे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हते, अशा शक्ती आज राष्ट्रवादाची भाषा शिकवत आहेत, हे आश्चर्य आहे.’’
त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय जनता पक्ष राष्‍ट्रवाद व देशभक्तीची व्याख्या बदलू पाहत आहे. राष्‍ट्रवाद सांगताना देशातील नागरिकांना समानतेच्या नजरेने पाहिले पाहिजे, केवळ जमीन व संपत्तीसाठी सत्ता संघर्ष करून देशभक्ती सिद्ध करता येत नाही, तर सत्ता मिळाल्यानंतर सर्वांचे जगणे सुसह्य होईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारणे यात राष्ट्रवाद आहे. देशात सध्या याउलट वातावरण आहे. धर्माच्या आधारे भेद निर्माण करणे, धनवानांचे अधिक भले करणे व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.’’
हिंदुत्वाची आयडियालॉजी वापरून मनुवाद मांडला जातोय. अशा विचारधारेच्या शक्तींचा संविधानाला विरोध आहे. हिंदुत्व हे सत्ता मिळविण्याचे शस्त्र बनले आहे. सत्तेच्या आधारे संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार संविधान देते. त्यावर घाला घालणाऱ्या शक्तींविरोधात आवाज एकजुटीने उठवला पाहिजे, असे करात यांनी सांगितले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. उदय नारकर, प्राचार्य ए. बी. जाधव, भरमा कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रेरणादायी
सामाजिक शोषण, जातिभेदाच्या विरोधात ज्या कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी आवाज उठवला. दुर्बल घटकांना आरक्षण दिले. त्यांचा समतेचा विचार पुढे देशाची एकता अखंडता टिकवून ठेवण्यासाठी पूरक आहे. तोच विचार घेऊन जाण्याची जबाबदारी सर्व घटकांची आहे. हीच खरी राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली ठरेल, असे मत श्रीमती करात यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84800 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..