मैत्री दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैत्री दिन साजरा
मैत्री दिन साजरा

मैत्री दिन साजरा

sakal_logo
By

41553

ही दोस्ती तुटायची नाय...
-
पावसाच्या सरी झेलत ‘मैत्री’चे सेलिब्रेशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणारा मैत्री दिन अर्थात फ्रेंडशिप डे यंदाही अत्यंत उत्साहात साजरा झाला. हा खास दिवस साजरा करायला तरुणाई मोठ्या संख्येने बाहेर पडली होती. पावसाच्या सरी झेलत मैत्रीचा धागा घट्ट करण्यासाठी तरुणाईने रंकाळा, महाविद्यालये, विविध कॅफे याठिकाणी गर्दी केली होती. एकमेकांच्या मनगटावर फ्रेंडशिप बँड्स बांधत मैत्रीचा धागा घट्ट केला. गप्पांचा फड रंगवतानाच सेल्फी सेलिब्रेशन रंगले. फक्त महाविद्यालयाच्या मित्र-मैत्रिणींपुरतेच या दिवसाला मर्यादित न ठेवता, लहानांबरोबर मोठ्यांनीही या सेलिब्रेशनमध्ये आवर्जून सहभाग घेतला.
नेहमीच्या सेलिब्रेशन पद्धतीबरोबरच काहींनी थोड्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यास पसंती दिली. सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती मैत्रीची वीण घट्ट केली. माणसाला नेहमीच उदंड देत राहणाऱ्या निसर्गाला कुणी मित्र मानून वृक्षारोपण केले, तर कुणी पाळीव प्राण्यांबरोबर हा दिवस व्यतीत केला. त्याचबरोबर पुस्तकप्रेमींनी पुस्तकांना आपला बेस्ट फ्रेंड मानत या सेलिब्रेशनमध्ये एक नवीन ट्रेंड आणला. सोशल मीडियावर तर फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मेसेजेस आणि फोटोंना उधाण आले होते. आपल्या खास मित्र-मैत्रिणींसोबतचे आठवणीतल्या क्षणांची छायाचित्रे स्टेटसला अपलोड करीत आठवणींना उजाळा दिला; तर फोटोंचा सुंदरसा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड केला. काही कारणास्तव दुरावलेल्या किंवा संपर्क कमी असलेल्या दोस्त मंडळींसाठीही सोशल मीडियावर संदेश लिहीत आपल्या नात्याला नव्याने सुरुवात केली. दोस्तांबरोबरच्या भटकंती आणि गप्पांबरोबरच मित्र-मैत्रिणींनी मनमुराद खव्वयेगिरी करीत हॉटेल्समध्ये गर्दी केली होती. अनेकांनी या निमित्ताने नवीन मित्र बनविले तर अनेकांनी त्यांच्या दुरावलेल्या नात्याला नवीन लकाकी दिली. एकूणच, मैत्रीच्या या अजोड नात्याला उत्साहात साजरे करीत आणि एकमेकांना अविरत साथ देण्याचे आश्वासन देत हा दिवस संस्मरणीय बनविला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85014 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..