रस्ते खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते खड्डे
रस्ते खड्डे

रस्ते खड्डे

sakal_logo
By

42331
42333
42334
42335
पावसाने रस्त्यांची ‘वाट’
--
खड्ड्यांमुळे दुरवस्था; वाहनधारकांची कसरत, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
कोल्हापूर, ता. १० ः पॅचवर्कअभावी वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांची तीन दिवसांच्या पावसामुळे अक्षरशः वाट लागली आहे. रस्ते प्रकल्पातील रस्ते वगळता शहरातील इतर ठिकाणच्या मुख्य रस्‍त्यांवर खड्डे नाहीत, अशी स्थिती नाही. वाट काढताना दुचाकीस्वारांची कसरत होत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाने काही रस्त्यांवरील डांबर पूर्ण उखडून गेले. केवळ खडी दिसत आहे. हे शहरातील रस्ते आहेत का, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत.
धो-धो कोसळलेल्या पावसामुळे शहरात अनेक भागांत पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी पाणी गटारीतून ओसंडून रस्त्यावरून वाहत सखल भागात जमा झाले. बहुतांश रस्त्यावर ही स्थिती असल्याने पाण्याच्या लोटामुळे उरलासुरला रस्ताही उखडून टाकला. महापालिकेने गेल्याच आठवड्यात तात्पुरती मलमपट्टी म्हणून मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. पावसाचे पाणी साठल्याने अनेक रस्त्यांवरील खड्डे समजून येत नव्हते. काल (ता. ९)पासून पावसाने उघडीप दिल्याने खड्डे दिसत असल्याने ठिकठिकाणी दुचाकीस्वार त्यातून मार्ग काढत आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

मुख्य रस्त्यांवर खड्डे
रस्ते प्रकल्पातील रस्ते सुस्थितीत असले तरी रेल्वेस्थानक ते व्हीनस कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे मोठे झाले आहेत. जरगनगर, आर. के. नगर, कळंबा, रायगड कॉलनी, पाचगाव, आपटेनगर, सानेगुरुजी वसाहत आदी दक्षिणेकडील उपनगरांतून शहरात येण्यासाठी बहुतांश जण रेसकोर्स ते मिरजकर तिकटी रस्त्याचा वापर करतात. त्याला पर्याय झालेल्या कळंबा कारागृह ते हॉकी स्टेडियमपर्यंतचा रस्ताही वापरतात. हे दोन्ही रस्ते पॅचवर्कने दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेले आहेत.
निवृत्ती चौक ते मिरजकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पापाची तिकटी, बिंदू चौक ते आझाद चौक, पापाची तिकटी ते मटण मार्केट, असेंब्ली रोड, ट्रेड सेंटर ते सासने मैदान, गुजरी कॉर्नर ते बाबूजमाल रोड, कळंबा साईमंदिर ते आपटेनगर चौक, रंकाळा स्टॅंड ते तटाकडील तालीम, गोखले महाविद्यालय ते शाहूनगर, जावळाचा गणपती ते उत्तरेश्‍वर पेठ, रंकाळा टॉवर ते गणेश विसर्जन कुंड, कळंबा साई मंदिर ते देवकर पाणंद चौक, गंगावेश चौक या रस्‍त्यांवर खड्ड्यांमुळे दुचाकी चालविणे कठीण झाले आहे.

काही ठिकाणी मुरमाचे पॅचवर्क
छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक महापालिकेचे कर्मचारी पुन्हा मुरमाने खड्डे भरण्याचा प्रयत्न करीत होते. पावसाच्या उघडिपीमुळे खड्डे भरून काढून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण, अन्य ठिकाणी असा प्रकार दिसून आला नव्हता.

शुक्रवारीच निविदा प्रसिद्ध
पॅचवर्कसाठीच्या चारही विभागीय कार्यालयांची एकत्रित ८९ लाखांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. पण, यातून होणारे पॅचवर्क प्रचंड खराब झालेल्या किती रस्त्यांना चांगले करू शकते, ही शंकाच आहे. मंगळवार पेठेतील मुख्य रस्त्यावर यापूर्वी केलेले पॅचवर्क सुस्थितीत आहे. पण, जिथे पॅचवर्क केले नव्हते, तिथे खड्डेच खड्डे आहेत.

कोट
टेंडरची प्रक्रिया झाली असून पावसाने ४ दिवस उघडिप दिल्यास पॅचवर्क सुरू करू शकतो. प्रमुख रस्ते व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचे पॅचवर्कचे काम केले जाणार आहे.
-नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85847 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..