पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

७०८५
अपघातात जखमी झालेल्या
घुणकीतील महिलेचा मृत्यू
घुणकी : पुणे-बंगळूर महामार्गावर वाघवाडी फाट्यावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या घुणकीतील महिलेचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. श्रीमती वंदना प्रल्हाद मोहिते (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. इस्लामपूर येथे होणाऱ्या एका शिबिरात आरोग्य तपासणीसाठी येथील नऊ महिला रुग्णवाहिकेतून गेल्या होत्या. परत येताना रुग्णवाहिकेस वाघवाडी फाटा (इस्लामपूर) येथे अपघात झाल्याने महिला गंभीर जखमी झाल्या. इस्लामपुरातील खासगी रुग्णालयातून वंदना मोहिते यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सासू, सासरे असा परिवार आहे.

कागलमधील एकावर छेडछाडीचा गुन्हा
कागल : महिलेची छेड काढल्याप्रकरणी येथील एकाविरोधात कागल पोलिसांत गुन्हा नोंद केला. राजू ऊर्फ परसू प्रताप कांबळे (रा. शाहू नगर बेघर वसाहत, कागल) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला आज अटक करत त्याच्याकडील धारदार शस्त्र जप्त केले. दोन महिन्यांपासून संशयित महिलेची छेड काढत होता. तिचा पाठलाग करत घराशेजारील बंद दरवाजावर कोयत्याने मारले होते. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक पटेकर हे करत आहेत.

११५६
हसूर दुमालात तरुणाची आत्महत्या
सोनाळी ः हसूर दुमाला (ता. करवीर) येथील युवक महेश सदाशिव खराडे (वय ३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली असून, आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज सकाळी महेश दुसऱ्या मजल्यावरून खाली न आल्याने शोध घेतला असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्याच्या मागे, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

मृताच्या नातेवाइकांना आवाहन
गांधीनगर : पांगरी (ता. बार्शी) येथील मुकेश आप्पा काळे (वय ४०) यांचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे कुणीही नातेवाईक नसल्याने गांधीनगर पोलिसांत बेवारस म्हणून नोंद झाली असून नातेवाईक असल्यास त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन गांधीनगर पोलिसांनी केले आहे. हेडकॉन्स्टेबल एस. एस. सुदर्शनी तपास करीत आहेत.

वाहतुकीस अडथळा दोघांवर कारवाई
कोल्हापूर ः वाहतुकीस अडथळा होईल, अशी चारचाकी पार्किंग करणाऱ्या दोन वाहन चालकांवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. शाहूपुरी व्यापारी पेठ येथे काल दुपारी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातात तरुण जखमी
कोल्हापूर ः मार्केट यार्ड परिसरात मोटारीच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी झाला. किरण भिकाजी चौगले (वय ३६) असे जखमीचे नाव आहे. एमआयडीसीतून कामावरून येताना ही घटना घडली असल्याची तक्रार चौगले यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कमानपाटा पडून एक जण जखमी
कोल्हापूर ः केएमटी वर्कशॉफ बुद्धगार्डन येथे कमानपाटा पडल्याने एक जण जखमी झाला. दिनकर चांदणे असे जखमीचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86011 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..