पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी
चिपरीतील एकाला सक्तमजुरी
पेठवडगाव : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा वडगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. एम. पठाण यांनी सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी, लाटवडे (ता. हातकणंगले) येथील सुषमा पांडव यांचे नरेंद्र लक्ष्मण पांडव(चिपरी, ता. शिरोळ) याच्याशी डिसेंबर २०१४ ला विवाह झाला. लग्नानंतर पती-पत्नी गोवा येथे राहण्यास गेले. तेथे पतीने पत्नीस आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्याने शिवीगाळ, अपमानास्पद बोलणे, हेटाळणी करून मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. याशिवाय सासरे सूर्यकांत निर्मळे यांना मारहाण केली. याबाबतचा तपास सहायक फौजदार बजरंग पोवार यांनी करून पुरावे सादर केले. यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. एम. पठाण यांनी दोन वर्षांची सक्तमजुरी व साडेतीन हजार दंड अशी शिक्षा दिली. सरकार पक्षाकडून एन. एस. नरवाडकर यांनी काम पाहिले.

१६९४
गुडाळमध्ये बंद घर फोडले
कसबा तारळे ः गुडाळ (ता. राधानगरी) येथे बंद घर फोडून चोरट्यांनी धुडघूस घातला. घरमालक बाहेरगावी असल्याने ते आल्यानंतरच चोरांच्या हाती काही लागले की नाही, याचा उलगडा होईल. गुडाळ-खिंडी व्हरवडे मुख्य रस्त्यावर संभाजी तुकाराम पाटील (सध्या पुणे) यांचे कुलूपबंद घर आहे. घराचे कुलूप बुधवारी पहाटेच्या दरम्यान तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना रात्री उघडकीस आली. संभाजी पाटील पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. मंगळवारी सकाळी श्री. पाटील घर कुलूपबंद करून पुण्याला गेले. बुधवारी पहाटे चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील कपडे, तसेच इतर साहित्य विस्कटले. रात्री गावात राहणारे संभाजी यांचे मोठे बंधू विठ्ठल पाटील यांना संभाजी पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती गावकऱ्यांकडून समजल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.

तुर्केवाडीतील एकाला जीवे मारण्याची धमकी
चंदगड ः तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील गणपतराव दत्तात्रय जाधव यांना जमिनीच्या मालकीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित बाबाजी गणू गावडे, विश्वनाथ गणू गावडे, मल्लवा बाबाजी गावडे, शोभा विश्वनाथ गावडे, पुंडलिक बाबाजी गाडे, निशा राजू गावडे, राजू बाबाजी गावडे यांच्या विरोधात येथील पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. जाधव व गावडे कुटुंबात दोन वर्षांपासून जमिनीच्या हक्कावरून वाद सुरू आहे. दिवाणी न्यायालयाने या वादग्रस्त जागेत जाण्यास संशयित आरोपींना मनाई केली आहे, असे असताना ते सर्वजण संगनमताने शेतात जाऊन जाधव यांचे जनावरांचे घर पाडले. ऊस तोडून नुकसान करीत असताना जाधव यांनी विचारणा केली. त्यावर या सातही जणांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक पाटील तपास करीत आहेत.

इचलकरंजीत घरफोडीत रोकड पळविली
इचलकरंजी : येथील कृष्णानगर भागातील बंद घर फोडून चोरट्याने पंधरा हजार रुपये लांबवले. याप्रकरणी चोरट्यावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अजय पडियार यांनी पोलिसांत दिली. कृष्णानगर येथील नेमिष्टे मळ्यात पडियार कुटुंब राहते. टुंब कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते. याचा फायदा उठवत बुधवारी (ता.१०) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंद घर फोडून तिजोरीतील पंधरा हजार रुपये पळविली. हा सगळा प्रकार आज सकाळी निदर्शनास आल्यानंतर अजय पडियार यांनी शहापूर पोलिसांत धाव घेतली.

झुंजीत जखमी गव्याचा अखेर मृत्यू
देवाळे ः पन्हाळा वनविभागाच्या हद्दीत सोमवारपेठ-तुरुकवाडी रस्त्यावर लक्ष्मी कुरण परिसरात गव्यांच्या झुंडीत जखमी झालेल्या गव्याचा अखेर मृत्यू झाला. जखमी अवस्थेत पडलेल्या गव्यावर पन्हाळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने उपचार केले होते, पण वन विभागाच्या प्रयत्नाला आज अपयश आले. आज सकाळी गव्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृत गव्याला जेसीबीच्या साहाय्याने खड्डा काढून दफन केले.

गुटखाप्रकरणी दोघांना कोठडी
जयसिंगपूर : शिरोळ येथे विविध सुंगधी तंबाखू व गुटखा वाहतूक करीत असताना शिरोळ पोलिसांनी बुधवारी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणातील अमर पाशामिया शेख व रफिक महंमद शेख (दोघे रा. इस्लामपूरा जि.लातूर) यांना शिरोळ पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. दरम्यान, आज जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर सकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.

जयसिंगपुरात जुगाऱ्यावर कारवाई
जयसिंगपूर : येथील शाहूनगर येथे उघड्यावर जुगार खेळताना उमेश चंद्रकांत कोतवाल (जयसिंगपूर) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई बुधवारी केली. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांनी दिली आहे.

वाहतुकीस अडथळा तिघांवर कारवाई
कोल्हापूर ः वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेल्या दोन दिवसांत तिघा चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. स्टेशनरोड आणि व्हिनस कार्नर परिसरात ही कारवाई केली.

कोथळीत अनोळखी मृतदेह
जयसिंगपूर : कोथळी (ता.शिरोळ) येथील वारणा नदीवरील असलेल्या बंधाऱ्यालगत संभाजी परीट यांच्या शेतालगत अंदाजे ४० ते ४५ वयाचा पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86300 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..