कोल्हापूर : पूरस्थितीवर उपायांसाठी मंत्रालयात बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Meeting in Ministry for solutions to flood situation Chief Minister Eknath Shinde kolhapur
पूरस्थितीवर उपायांसाठी मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : पूरस्थितीवर उपायांसाठी मंत्रालयात बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कमी, मध्यम आणि दीर्घकालीन विकास आराखड्यासंदर्भात मंत्रालयात स्वतंत्र बैठकीचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘आढावा बैठकीत आमदार, खासदारांनी जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली. झालेले नुकसान आणि त्याच्या भरपाईबाबत आढावाही घेण्यात आला. यानंतर जिल्ह्यातील पूरस्थितीसाठी कायमस्वरूपी कमी, मध्यम आणि दीर्घकालीन विकास आराखड्यासंदर्भात चर्चा झाली असून, मंत्रालयात याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निधी दिला जाईल.

मी आणि उपमुख्‍यमंत्र्यांनी मंत्रालयात याबाबतचे सादरीकरण पाहिले आहे. याबाबत आता काही सांगणार नाही; मात्र यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पंचनाम्यांचाही आढावा घेतला. पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठीही निधी दिला जाईल. ‘एनडीआरएफ’च्या निकषाच्या दुप्‍पट भरपाई देण्याचा निर्णय मंत्रालयात घेतला आहे. तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल. आजपर्यंत असा निर्णय कधीच झाला नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे.’’ मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘यापूर्वी शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांना न मिळालेली मदतही दिली जाईल. कायमस्वरूपी निवारे बांधले जातील. रस्ते, पूल वाहून गेले आहेत. त्यांच्या पुनःबांधकामासाठीही निधी दिला जाईल. पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करताना शिवाजी विद्यापीठाचेही सहकार्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यासाठी जितका लागेल तितका निधी दिला जाईल. नदीची खोली, रुंदी वाढविणे, गाळ काढणे याबाबतही मंत्रालयात निर्णय घेतला जाईल. पूरस्थितीबाबत जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जाईल. यात तज्ज्ञांचीही मते घेतली जातील. आलमट्टी धरणाचा विसर्ग आणि स्थानिक परिस्थिती प्रशासनाने योग्य पद्धतीने हाताळल्याने आज पूरस्थिती नियंत्रणात राहिली आहे. पूरस्थितीत स्थलांतर करण्यासह त्यांना आवश्‍यक सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्यांना आवश्‍यक तो निधी दिला जाईल. हे सरकार सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे आहे.’’
या वेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह आमदार, मंत्री, खासदारांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी दिली बगल
पर्यावरणाच्या विरोधात इचलकरंजीत गणेशमूर्ती नदीत विसर्जित करण्याची भूमिका आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली आहे, त्यावर तुमची भूमिका काय, या प्रश्‍नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर झाले. त्यांनी प्रश्‍नाला बगल देत पूरस्थितीतील सर्वांना मदत केली जाईल, हे सरकार शेतकऱ्यांचे व जनतेचे असल्याचे सांगितले.

गांधी मैदान...
शहरातील गांधी मैदानात पाणीच पाणी झाले होते. याची माहिती मला आढावा बैठकीत देण्यात आली आहे. मैदानात पाणी साचल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली जाईल. निधीची कमतरता पडणार नाही. याबाबत आवश्‍यक त्या सर्व योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

जयप्रभा स्टुडिओ
हे सरकार जनभावनेचा आदर करणारे सरकार आहे. त्यामुळे कोल्‍हापुरातील जयप्रभा स्टुडिओसंदर्भात दोन-तीन प्रस्ताव माझ्याकडे आले आहेत. जनभावनेचा आदर करून योग्य तो प्रस्ताव देण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत, असेही मुख्‍यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आले रस्त्यावर...
पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालयात थांबण्यास काही पोलिसांनी मज्जाव केल्यने पत्रकारांनी थेट रस्त्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर येऊन थांबले. यानंतर पोलिस आणि महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यावरच थांबण्यावर पत्रकार ठाम राहिले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक संपल्यावर थेट रस्त्यावर येऊन पत्रकारांशी संवाद साधला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86972 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..