महावितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण
महावितरण

महावितरण

sakal_logo
By

वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे
वारस मदतीच्या प्रतीक्षेत
---
संघ राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः तीन वर्षांत ‘महावितरण’कडे सेवा बजावणाऱ्या ७० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. अशांना मदतीचा छदामही मिळालेला नाही. नवीन ऊर्जामंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा वीज कंत्राटी कर्मचारी कामगार राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
‘महावितरण’कडे वीज कर्मचारी संख्या कमी आहे. अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे नियमित वीज तांत्रिक कामे तसेच प्रशासकीय काम करण्यासाठी ठेकेदारामार्फत जादा मनुष्यबळ (कंत्राटी तत्त्वावर) घेतले आहे. या कंत्राटींनी ‘महावितरण’ने नेमून दिलेली कामे केल्यावर महावितरण ठेकेदारांना दरमहा बिल देते. त्यातून ठेकेदार संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देते, अशी रचना आहे.
वीजजोडणी, दुरुस्ती, वीज मीटर बसविणे, वीजबिलांची वसुली व प्रशासकीय कामात मदत असे काम कंत्राटीमार्फत केले जाते. यात जिल्ह्यात एक हजार २०० हून अधिक कंत्राटी आहेत; तर राज्यात जवळपास ४५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्यासाठी २३ ठेकेदार कंपन्यांनी असे मनुष्यबळ ‘महावितरण’ला पुरविले आहे.
‘महावितरण’च्या वायरमनबरोबर कंत्राटी कर्मचारीही दुरुस्ती कामात मदत करतात. यात खांबावर चढणे, वीजतारा जोडणे, फ्यूज बॉक्स बदलणे अशी कामे करताना झालेल्या अपघातांत ७० कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.
या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत मिळणे अपेक्षित होते. ‘महानिर्मिती’कडे असलेल्या कंत्राटी कामगारांसाठीही दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, ‘महावितरण’कडे काम करणाऱ्या ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांनाही नुकसान भरपाई द्यावी कोणी, असा प्रश्न आहे. ‘महावितरण’ म्हणते, कंत्राटी कामगार ठेकेदारांकडून पुरविण्यात येतात. त्याचा ‘महावितरण’शी संबंध नाही, तर कंत्राटी कर्मचारी म्हणतात, ठेकेदारांकडून आमची नियुक्ती झाली असली तरी ‘महावितरण’तर्फे आम्ही काम करीत असतो. त्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. अशा परस्परविरोधी दाव्यात अद्याप मदत मिळालेली नसल्याचे चित्र आहे.

कोट
वीज देखभाल दुरुस्तीचे काम जोखमीचे आहे. अनेकदा अपघात होतात. काही कर्मचारी गंभीर जखमी होतात. अशांना तत्काळ आरोग्य उपचार सेवेचा लाभ मिळाला पाहिजे. एखाद्या कंत्राटीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत आहोत. तीन वर्षे वाद भिजत पडला आहे. त्यामुळे आम्ही नवीन ऊर्जामंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहोत. त्यांनी मृत कंत्राटी कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा आहे. अन्यथा राज्यभर कामबंद आंदोलन करू.
- नीलेश खरात, राज्याध्यक्ष, वीज कंत्राटी संघ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87245 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..