मुख्य प्रशासकीय ध्वजवंदन आणि चौकटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्य प्रशासकीय ध्वजवंदन आणि चौकटी
मुख्य प्रशासकीय ध्वजवंदन आणि चौकटी

मुख्य प्रशासकीय ध्वजवंदन आणि चौकटी

sakal_logo
By

43358

वैभवशाली राष्ट्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत
---
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा
कोल्हापूर, ता. १६ ः देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून, त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांना प्रदीर्घ लढा द्यावा लागला होता. त्यामुळे मिळालेल्या या स्वातंत्र्याला टिकविण्यासाठी व वैभवशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काल (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात ते बोलत होते.
नऊ वाजून पाच मिनिटांनी मंत्री पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. मान्यवरांच्या हस्ते तीन रंगांचे फुगे हवेत सोडून स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांची मंत्री पाटील यांनी भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, की घरोघरी तिरंगा फडकावण्याचा उत्साह व अभिमान निर्माण झालेला आहे. स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून, त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा प्रदीर्घ लढा दिला आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

चौकट
संविधान स्तंभाचे अनावरण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या संविधान स्तंभाचे अनावरण मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या संविधान स्तंभाची उंची १५ फूट आहे. हा स्तंभ अवघ्या आठ दिवसांत तयार करून घेतल्याबद्दल श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. संविधान स्तंभाच्या चबुतऱ्याचे दगडी बांधकाम दहा फूट उंचीचे असून, त्यावर सोनेरी रंगाची पाच फूट उंचीची आकर्षक राजमुद्रा बसवली आहे. शिल्पकार पीयूष सुतार यांनी ही राजमुद्रा साकारली आहे. लामण दिवा व सेल्फी पॉइंट अभ्यागतांचे आकर्षण ठरत असून, याठिकाणी छायाचित्र घेण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.

चौकट
पुरस्कार वितरण व सत्कार
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील दुर्गम भागात आरोग्य सेवा दिलेले कर्मचारी प्रकाश नाईक, दीपाली गोवीलकर, रेखा दोरूगडे, शांता जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, पिंपळगाव खुर्द येथे लसीकरण कार्यक्रमात सतर्कतेने तोतया डॉक्टर पकडून देणारे आरोग्य कर्मचारी अजित चौगुले, देवानंद कांबळे, अर्चना सरनाईक, माधुरी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक शिक्षण विभागाचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२१ मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी योगेश अशोक नेजे, ईशान भूषण म्हेत्रे, रोहन शहाजी पाटील, विश्वजित विनायक बांदल यांचाही सत्कार झाला. स्वच्छ विद्यालय राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शाळांचा गौरव झाला. यात प्राथमिक शहरी भागातून कोल्हापूर पब्लिक स्कूल (राज्यात प्रथम), माध्यमिक ग्रामीण भागातून आदर्श विद्यालय कोथळी, ता. शिरोळ (राज्यात प्रथम) यांचा समावेश आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ॲपल हॉस्पिटल व सावित्रीबाई फुले यांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला.

चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अद्याप तिरंगा उतरविला नसल्यास सन्मानपूर्वक उतरवून जतन करून ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. शासनाच्या सूचनांनुसार सर्वांनी राष्ट्रध्वज उतरवून सन्मानपूर्वक जतन करून ठेवला आहे. तथापि, अपवादात्मक ठिकाणी घरांवर, दुकानांवर, गाडी व रिक्षांवर तिरंगा ठेवलेल्या नागरिकांनी तिरंगा सन्मानपूर्वक उतरवून जतन करून ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87343 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..