दहीहंडी फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडी फीचर
दहीहंडी फीचर

दहीहंडी फीचर

sakal_logo
By

लाखमोलाच्या बक्षिसांच्या दहीहंडीचा थरथराट उद्या

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता पुन्हा दहीहंडीचा थरार शुक्रवारी (ता. १९) अनुभवायला मिळणार आहे. शहरातील चार ठिकाणी लाखमोलाच्या बक्षिसांच्या दहीहंडी होणार असून, सुरक्षिततेच्या उपायांसह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सेलिब्रिटींची उपस्थिती आणि अत्याधुनिक साउंड व म्युझिक सिस्टिमसह नृत्याविष्काराच्या साक्षीने हे रंगारंग सोहळे सजणार आहेत. त्याशिवाय, धान्य व्यापारी मंडळ, बावडेकर आखाडा, भाऊ नाईक गल्ली आदी ठिकाणीही पारंपरिक उत्साहात दहीहंडी होईल. दुपारी चारपासून सर्वत्र दहीहंडीचा हा थरथराट अनुभवायला मिळणार आहे.

महाडिक युवाशक्तीचे
यंदा तीन लाखांचे बक्षीस
धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भारतीय जनता पक्षातर्फे दसरा चौकात दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हंडी फोडणाऱ्या पथकाला यंदा तीन लाखांचे बक्षीस असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहनपर विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. महिला गोविंदा पथकाला विशेष प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार असून, वृत्तपत्र व हौशी छायाचित्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी चौकात
दीड लाखाची भगवी दहीहंडी
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या माजी खजानीस वैशाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीड लाखाची भगवी दहीहंडी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसेना शाखा आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळातर्फे हा सोहळा होईल. विविध सांकृतिक कार्यक्रमांसह सलामीसाठी, विविध थरांसाठी रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार असून, महिलांसाठी खास ‘खेळ पैठणी’चा स्पॉट गेमसह आकर्षक बक्षिसांची पर्वणी असेल. सर्वांत वरच्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केली असून, श्री शाहू गर्जना ढोल वाद्य पथकाकडून सलामी दिली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी चारला या सोहळ्याला प्रारंभ होईल.

मिरजकर तिकटीला
निष्ठेची लाखाची दहीहंडी
शिवसेनेतर्फे मिरजकर तिकटी येथे यंदा दहीहंडी होणार आहे. हंडी फोडणाऱ्या पथकाला एक लाखाचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. सलामीसाठी आकर्षक बक्षिसे, आकर्षक रोषणाईसह नृत्याविष्कारांच्या साक्षीने होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक मोठ्या संख्येने हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्यू गुजरी मंडळातर्फे
एक लाखाचे बक्षीस
येथील न्यू गुजरी मंडळातर्फे यंदा दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. शुक्रवारी (ता. १९) दुपारी चारपासून गुजरी चौकात या दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. अत्याधुनिक साउंड, म्युझिक आणि लाईट इफेक्टसह डान्स ग्रुप आणि करवीर झांजपथकाच्या साक्षीने येथे दहीहंडीचा सोहळा होईल. पाच आणि सहा थर लावून सलामी देणाऱ्या पथकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस असेल. मुंबईचा प्रसिद्ध अहिरे बॉलिवूड डान्स ग्रुप यांच्यासह आघाडीच्या नृत्यांगना धनिया पांडे, लावण्या जगताप, ‘लावणी’फेम गौरी जाधव यांचा नृत्याविष्कार येथे अनुभवायला मिळणार आहे. महिला आणि लहान मुलांना हा सोहळा पाहण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था केल्याचे माजी नगरसेवक किरण नकाते यांनी सांगितले.
--
वाहतूक मार्गात बदल
दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी (महाद्वार रोड) आणि मिरजकर तिकटी या चार ठिकाणी दहीहंडीचे भव्य सोहळे होणार असल्याने वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. व्हीनस कॉर्नर ते सीपीआर चौक, सीपीआर चौक ते भवानी मंडप, महाद्वार रोड, गंगावेश ते माळकर तिकटी हे मार्ग दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद राहतील. बिंदू चौकाकडून मिरजकर तिकटीला येणारी वाहने प्रायव्हेट हायस्कूलमार्गे, दिलबहार तालमीकडून मिरजकर तिकटीला येणारी वाहनेही प्रायव्हेट हायस्कूलमार्गे पुढे मार्गस्थ होतील. बिनखांबी गणेश मंदिराकडून येणारी वाहने महाद्वार चौकातून ताराबाई रोडमार्गे पुढे मार्गस्थ होतील. संभाजीनगरकडून मिरजकर तिकटीला येणारी वाहने कोळेकर तिकटी, शिंगोशी मार्केट, जयप्रभा स्टुडिओमार्गे पुढे मार्गस्थ होतील.
--
पार्किंगची ठिकाणे
चित्रदुर्ग मठ, करवीर पंचायत समिती येथे दुचाकींसाठी, तर व्हीनस कॉर्नर येथील गाडीअड्डा परिसर, शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियम बाहेरील बाजूस दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग करता येतील. शहाजी महाविद्यालय, खानविलकर पेट्रोलपंप, शंभर फुटी रस्ता, प्रायव्हेट हायस्कूल, बिंदू चौक, महापालिका पार्किंग येथे चारचाकींसाठी पार्किंग व्यवस्था असेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87666 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..