संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

02472
माजगाव ः येथील पुलाजवळचा रस्ता खचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

माजगाव पुलावर रस्ता खचला
माजगाव ः कासारी नदीवरील माजगाव पोर्ले (ता. पन्हाळा)दरम्यानच्या पुलाजवळचा रस्ता पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे खचला आहे. पूर ओसरल्याने या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. या ठिकाणी अपघात होऊ शकतो. अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. हा पूल एकेरी वाहतुकीसाठी असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. तीन महिन्यांपूर्वी पुलाचे अर्धवट राहिलेल्या स्लॅबचे काम पूर्ण होऊन हा पूल दुहेरी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या पूर्वेकडील बाजूचा रस्ता खचला आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. वाहनधारकांना रात्री खचलेल्या रस्त्याचा अंदाज येत नाही. या पुलावरून दररोज १० ते १५ गावच्या वाहनांची वाहतूक सुरू असते.

02474
वाघवे ः येथे सेंद्रिय शेती कार्यशाळा व रानभाज्या महोत्सवातील सेंद्रिय भाज्या.


वाघवेत रानभाज्या महोत्सव
माजगाव ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव स्वराज्य मोहिमेअंतर्गत पन्हाळा पंचायत समिती, ग्रामपंचायत व कृषी विभाग आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने वाघवे (ता. पन्हाळा) येथे सेंद्रिय शेती कार्यशाळा झाली व रानाभाज्या महोत्सव झाला. गोमातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. सेंद्रिय शेतीतज्ज्ञ तानाजी निकम (कणेरीमठ), ऋषिकेश पाटील (म्हाळुंगे) आणि उत्तम पाटील यांनी सेंद्रिय शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी जीवामृत, दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक दाखविले. निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी रानाभाज्यांचे आहारातील महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने सेंद्रिय शेती अभियानांतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा, असे आवाहन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी शिंगे, कृषी विभागातील अधिकारी, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच प्रकाश कुऱ्हाडे, ग्रामसेवक संजय बिरंजे आदी उपस्थित होते.

प्रा. महादेव जाधव

02639
प्रा. महादेव जाधव यांना पीएचडी
कळे : प्रा. महादेव जयसिंग जाधव यांना शिवाजी विद्यापीठाची मराठी विषयातून पीएचडी पदवी मिळाली. सध्या ते कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ‘ज्ञानोदयमधील स्त्रियांचे लेखन व स्त्री जीवनाचे चित्रण’ हा संशोधनाचा विषय होता. या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ. विश्वनाथ शिंदे यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले. तसेच डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, संस्थाध्यक्ष विठ्ठल पाटील व प्रभारी प्राचार्य डॉ. के. एन. राक्षसे यांचे विशेष सहकार्य लाभले.

01727
प्रा. आप्पासाहेब खोत

प्रा. आप्पासाहेब खोत यांची निवड
बोरपाडळे : चिपळूण-गुहागर (रत्नागिरी) येथे २८ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय जागर मराठी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन जाखले (ता. पन्हाळा) येथील ग्रामीण कथाकथनकार, साहित्यिक प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते होणार आहे. पसायदान प्रतिष्ठान गुहागर व कोकण मराठी साहित्य परिषद आणि जितेंद्र आव्हाड युवा मंच आयोजित या संमेलनाच्या प्रारंभाची संधी मिळते आहे. यामागे वारणेच्या मातीचा आशीर्वाद आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘काळीज विकल्याची गोष्ट’ कथासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. तशा निमंत्रणाचे पत्र आयोजक बाळासाहेब लबडे यांचे मिळाल्याचे प्रा. खोत यांनी सांगितले.

कदमवाडीत शनिवारी निर्भय वॉक
कोल्हापूर ः अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवारी (ता. २०) कदमवाडी परिसरातून निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम होणार आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, शहीद गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा उपक्रम होणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्ष सरोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज येथून सकाळी आठला उपक्रमाला प्रारंभ होईल. त्यानंतर कदमवाडी माझी शाळा, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सदर बाजार ते पुन्हा राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज या मार्गावरून हा उपक्रम होईल.

01950
माधुरी घराळ यांची कुस्ती प्रशिक्षकपदी निवड
कसबा बीड ः कोगे (ता. करवीर) येथील माधुरी गंगाराम घराळ- राष्ट्रीय महिला कुस्तीपटू (एन.आय.एस. कोच) यांची बल्गेरिया (सोफिया) येथे होणाऱ्या यु-२० ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कुस्ती प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. या स्पर्धा १५ ते २१ ऑगस्टदरम्यान आहेत. कुस्ती प्रशिक्षकपदी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे व कोल्हापूर तालीम संघ यांचे सहकार्य लाभले आहे. त्यांना वडील पैलवान गंगाराम घराळ यांचे प्रोत्साहन लाभले आहे.


03796
कोनवडे : निळपण, ता. भुदरगड शाळेस ए. एस. सारंग यांच्याकडे टीव्ही प्रदानप्रसंगी माजी विद्यार्थी व शिक्षक.

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला टीव्ही
कोनवडे : निळपण (ता. भुदरगड) येथील जवाहर हायस्कूलच्या दहावीच्या २०१०-११ च्या बॅचने वर्गमित्र प्रवीण जाधव यांच्या स्मरणार्थ शाळेस वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन व शाळेची गरज ओळखून शाळेसाठी पहिला स्मार्ट टीव्ही दिला. २०१०-११ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेची गरज ओळखून शाळेसाठी स्मार्ट टीव्ही दिला. अलीकडे गेट-टुगेदर होताना दिसतात. त्या गेट-टुगेदरच्या निमित्ताने स्नेहभोजनाचे आयोजन केले जाते; पण या विद्यार्थ्यांनी या परंपरेला फाटा देत वर्गमित्र प्रवीण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला उपयोगात येणारा पहिला स्मार्ट टीव्ही दिला. यावेळी मुख्याध्यापक एन. एस. सारंग यांच्याकडे टीव्ही दिला. यावेळी सूरज बुजरे, मयूर सुतार, बाबूराव रामाने, श्रावण देसाई, रोहित देसाई, शरद शिंदे, अमित शिंदे, प्रशांत देसाई, अक्षय सुतार, सूरज कांबळे, दत्तात्रय पाटील, सुनील सुतार, नीलेश मांडे, ओमकार नीलवर्ण, राहुल घाटगे आदी उपस्थित होते.


03156
कोलोली ः चष्मे वाटपप्रसंगी युवा शक्तीचे कार्यकर्ते.

कोलोलीत मोफत चष्मे वाटप
पुनाळ : कोलोली (ता. पन्हाळा) येथे मोफत डोळे तपासणी शिबिर होऊन चष्मे वाटपाचा कार्यक्रम झाला. धनंजय महाडिक युवाशक्ती व पन्हाळा-गगनबावडा प्रेस क्लबतर्फे कोलोली येथील २०० लोकांची मोफत डोळे तपासणी झाली. यावेळी ९४ लोकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तपासणीसाठी आलेल्या प्रत्येकाला दोन साबण भेट स्वरूपात देण्यात आले. गतवर्षी आलेल्या महापुरात कोलोलीतील ज्या घरात पुराचे पाणी आले त्या प्रत्येक घरात पाच हजार रुपयांचे किट वाटप केले होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन युवाशक्तीचे अध्यक्ष बाबासो हिंदुराव पाटील व आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. रेवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी युवाशक्तीचे युवराज वरुटे, सरदार जाधव, कृष्णात पाटील, शरद कुंभार, पन्हाळा प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण मस्कर, सुरेश वडर, सूरज चौगुले, झाकीर मुजावर, शिवसेनेचे संभाजी जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87668 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..