नाद खुळा! कोल्हापूरचा 'बायोगॅस पॅटर्न' राष्ट्रीय पातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाद खुळा! कोल्हापूरचा 'बायोगॅस पॅटर्न' राष्ट्रीय पातळीवर
कोल्हापूरचा ''बायोगॅस पॅटर्न'' राष्ट्रीय पातळीवर

नाद खुळा! कोल्हापूरचा 'बायोगॅस पॅटर्न' राष्ट्रीय पातळीवर

नवी दिल्ली : घरगुती बायोगॅस प्रकल्पांना शौचालय जोडून त्याद्वारे गॅस निर्मितीचा कोल्हापूर पॅटर्न राष्ट्रीय पातळीवर चर्चिला गेला. देशभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असा बायोगॅस प्रयोग करणारा कोल्हापूर देशातील एकमेव जिल्हा आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘बिग चेंज इज पॉसिबल’ या कार्यशाळेत कोल्हापूर बायोगॅस प्रकल्पाचे सादरीकरण झाले.

जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा समन्वयक विजयकुमार पाटील यांनी सादरीकरण केले. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट (सी. एस. ई) संस्थेने येथील इंडिया हॅबिट सेंटर येथे ‘बिग चेंज इस पॉसिबल’चे आयोजन केले होते. पेयजल आणि सांडपाणी व्यवस्थापनामध्ये लोकसहभागातून चांगले काम करणाऱ्या प्रयोगांचे येथे सादरीकरण झाले.

कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख २० हजार बायोगॅस प्रकल्प आहेत. त्यापैकी ९९ हजार ६५० प्रकल्पांना शौचालय जोडून सांडपाणी त्यामध्ये सोडण्यात आले आहे. त्यापासून गॅस निर्मिती करून त्याचा उपयोग स्वयंपाकासह अन्य गोष्टींसाठी केला जातो. मैला गाळ व्यवस्थापनाचा हा यशस्वी प्रयोग आहे. यासाठी देशभर अनेक उपक्रम राबवले जातात; मात्र कोल्हापूर जिल्ह्यात जेवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रयोग यशस्वी झाला, तसा तो कोठेही झाला नाही.

कार्यशाळेमध्ये सिक्कीम येथील पारंपरिक झऱ्यांचे व्यवस्थापन करून वर्षभर पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या प्रयोगाचेही सादरीकरण झाले. पारंपरिक पद्धतीने जलसंधारणाची कामे करून गुजरातमधील पाण्याचे दुर्भिक्ष असणारा डांग जिल्हा कसा पाणीदार झाला, याची माहिती देण्यात आली. छत्तीसगडमधील आदिवासी भागातील सांडपाणी व्यवस्थापनाचा यशस्वी प्रयोगही मांडण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावामध्ये आधुनिक शोषखड्डा बनवण्यात आला आहे. त्याचे अनुकरण करत संपूर्ण तेलंगणा राज्यामध्ये ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबवला गेला. याबाबत ही माहिती देण्यात आली. कार्यशाळेचा समारोप सी. एस. ई. सेंटरच्या संचालिका सुनीता नारायण यांनी केला. कार्यशाळेत पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

यांचाही गौरव

जिल्ह्यातील बाजारभोगावमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
वरणगे पाडळी व देवळेवाडी येथील शोषखड्ड्यांचा प्रकल्प‌
गारगोटी येथील सांडपाण्याचा ‘कल्चर बेस्ट ट्रिटमेंट प्लांट’
जिल्ह्यातील १३ गावांमध्ये प्रत्येक घरात बायोगॅस प्रकल्प
शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दलही कार्यशाळेमध्ये जिल्ह्याचा गौरव

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87951 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurdelhi