नशेचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नशेचा विळखा
नशेचा विळखा

नशेचा विळखा

sakal_logo
By

नशेच्या विळख्यात तरुणाई गुरफटतेय
कोडवर्डचा वापर करून विक्री ः विशिष्ट पेपरचाही वापर होत असल्याचे चित्र

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः ‘बटण’ची गोळी घेतली की, किमान २४ तास तरुणाई गुंगीत राहते. अनेक पानपट्टींमध्ये एक विशिष्ट पेपर मिळतो. तो घेऊन त्यावर गांजा टाकला की, धुंदी अशी चढते की, काय करतोय याचे भानच राहत नाही. व्हाईटनर बंद झाला; पण त्या जागी आता सोल्यूशन आले. हे सोल्यूशन टाकून त्याचा धूर घेतला की, गुंगीत किमान ३० तास जातो.
व्यसनाधीनतेची बदलत चाललेली ही उदाहरणं निश्चितच तरुणाईला बरबाद करणारी ठरत आहेत. या नशेचा सर्वाधिक विळखा राजेंद्रनगर आणि परिसरातील तरुणाईला बसला आहे. तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या या धंद्याची काही गुन्हेगारांनीच सहज म्हणून सुरवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून एक पिढी बरबाद होण्याचे काम केले आहे. या धंद्यातून पैशाची मोठी उलाढाल होत असल्याने खुलेआम हे सगळे प्रकार सुरू आहेत. पोलिसांकडे तक्रार केली तर तक्रार करणाऱ्यांची नावे लगेच या धंद्यातील लोकांना सांगितली जातात. त्याचा परिणाम म्हणून तक्रार करणारे सर्वजण भीतीच्या छायेखालीच आहेत. नशेमध्ये तरुणाईकडून होणारी कृत्ये सहन करण्यापलीकडे गेली असल्याचे या परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष होण्याचे काम केले जात आहे.

गुटखा गेला अन् रिझला आला
गुटख्यावर बंदी घातल्यानंतर त्याचा पर्याय म्हणून सध्या अनेक पानपट्ट्यांमधून रिझला नावाचा कागद किंवा त्यापासून बनवलेल्या सिगारची विक्री केली जाते. यामध्ये गांजा भरून नशा करण्याचा प्रक्रार सुरू आहे. यामध्ये एका कॉलेजच्या तरुणीही विळख्यात अडकत चालल्या आहेत. दिसताना अगदी सिगार ओढल्यासारखे दिसत असले तरी त्यातून नशाच केली जाते. काही दिवसांपूर्वी अन्न औषध विभागाने गुटख्याची विक्री केल्याच्या संशयावरून सील केलेल्या पानपट्टीची तपासणी केली तरी हे लक्षात येईल.

कोडवर्डने खरेदी
गांजा छकाट नावाने खरेदी केला जातो. अडीच किलो गांजा १५ हजार रुपयांच्या आसपास खरेदी केला जातो. यातही नागिन, शिलावती असे प्रकार आहेत. त्यानंतर याच्या १०० ग्रॅमच्या पुड्या करून नशेबाज तरुणांना पुरवल्या जातात. त्यांच्याकडून यासाठी २०० रुपयांपासून विविध पैसे घेतले जातात. काही वेळा हा काळा सोना नावानेही विकला जातो. नायट्रोसन म्हणून मिळणारी गोळी (जी मनोरुग्णांसाठी वापली जाते) बटण नावाने विकली जाते.

आता सोल्यूशनचा वापर
व्हाईटनर पिऊन नशा करणारी एक तरुण पिढी बरबाद होत होती. याच्यावर शासनाने बंदी आणली आणि व्हाईटनर पेन स्वरूपात उपलब्ध झाला. आता त्यावर उपाय म्हणून चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे सोल्यूशन कापडावर टाकून ते जाळून त्यातून येणाऱ्या धुरातून नशा केली जाते.

ठोस कारवाईची आवश्यकता
अनेक वेळा कारवाईसाठी पोलिसांना सांगितले की, पोलिसांकडून दीड किलोवर गांजा सापडला तरच कारवाई केली जाईल, असे सांगितले जाते. १०० ग्रॅम, २०० ग्रॅम सापडला तर ठोस कारवाईच होत नाही. त्याचा फायदा हा धंदा करणारे अनेकजण घेत आहेत. गुन्हेगारीतून सुरू झालेल्या या धंद्याचे आता मोठे परिणाम दिसू लागले आहेत. तरुणाई यातून बरबाद होत असल्याचे चित्र असून, यातील सूत्रधारांवरच आता ठोस कारवाईची आवश्यकता आहे.

प्रबोधनातून मार्ग काढावा
या तरुणाईला या नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची जशी आवश्यकता आहे, तशी या परिसरातील तरुणाईला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, प्रबोधन असे सामूहिक प्रयत्नही करण्याची गरज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88506 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..