पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

दहीहंडीच्या माहोलामुळे
शहरात वाहतुकीची कोंडी
कोल्हापूर ः शहरात सायंकाळनंतर मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. शहरात अनेक ठिकाणी आज दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उत्सव पाहण्यासाठी गर्दीचा महापूर लोटला होता. त्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती. या मार्गांवर वाहतुकीचा अतिरिक्त भार पडला होता. बेशिस्त पार्किंगमुळे कोंडीत आणखी भर पडत होती. त्यामुळे शहरातील अनेक मार्गावर सायंकाळनंतर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना व पर्यटकांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागला. ही कोंडी दूर करण्यासाठी बंदोबस्तातील पोलिसांना चांगलीच दमछाक करावी लागत होती.

44407
सिरसे येथे तरुणाची आत्महत्या
आवळी बुद्रुक ः सिरसे (ता. राधानगरी) येथे आज एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिष नानासाहेब पाटील (वय २२) असे तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : आज दुपारी घराच्या पाठीमागे गळफास घेतलेल्या स्थितीत आशिष दिसून आला. सायंकाळनंतर सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्य ताब्यात दिला. सिरसे येथे रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

02482
वाघवेत भिंत कोसळून नुकसान
माजगाव ः पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे पावसाने शिवाजी केरबा मगदूम यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. परिसरात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. शिवाजी केरबा मगदूम यांच्या राहत्या घराची भिंत मध्यरात्री पावसाने कोसळली. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. मगदूम यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले असून, या घटनेचा पंचनामा तलाठी विकास मोहिते यांनी केला आहे.

44334
इचलकरंजी आगारात खड्ड्यात वृक्षारोपण
इचलकरंजी : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर खड्डे मुक्त व्हावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानकामध्ये खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्ड्यामध्ये बसून निषेध व्यक्त करण्यात आला. सदर मागणीचे निवेदन आगर प्रमुखांच्याकडे देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संतोष सावंत, जिल्हा संघटक अरविंद माने, वैभव खोंद्रे, विजय मुतालिक, आनंदा मकोटे, संग्राम सटाले, किरण माने, श्रीधर माने, सुरज बेलेकर, दीपक सुतार, बसवराज टकळगी, प्रसाद गुरव, श्रीभाऊ सुतार, गणेश कोडखटि, प्रदीप माने, सागर कोडखटी, कल्पेश चिरमुटे, अभी झपाटे, प्रमोद नलावडे रोहित मडाळे, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.

१७२४
बांबवडेत रास्ता रोको आंदोलन
बांबवडे ः भारतीय दलित महासंघाने येथे रास्ता रोको आंदोलन करून स्त्रियांसह दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल सरकारने कडक कारवाईची मागणी केली. देशात विविध राज्यांत दलित महिला, अल्पवयीन मुले, विद्यार्थी व समाजावर अन्याय व दोषींवर कडक कारवाईसाठी आंदोलन केले. मागणीचे निवेदन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रिकांत कांबळे यांनी पोलिस निरीक्षक विजय पाटील यांना दिले. श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, दयानंद कांबळे, आकाश कांबळे, पन्नालाल इंगळे, विक्रम समुद्रे, किरण कांबळे, मानसिंग आडके, सुभाष सकटे, गणेश कांबळे, किरण पाटील, अमर काळे, सचिन कांबळे, दयानंद शिवजातक, हर्षवर्धन कांबळे, आदिनाथ रणभिसे आदी उपस्थित होते.

वाहतुकीस अडथळा
कोल्हापूर ः वाहतुकीस अडथळा होईल आणि धोकादायकरीत्या रस्त्यावर ट्रक आणि चारचाकी पार्किंग केल्याबद्दल तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ताराराणी चौक आणि ताराबाई पार्क परिसरात गेल्या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तूर येथून कॉलेज युवती बेपत्ता
उत्तूर ः येथील २२ वर्षीय कॉलेज युवती बेपत्ता झाली आहे. याबाबत युवतीच्या आईने पोलिसांत वर्दी दिली. युवती कॉलेजला जातो, असे सांगून घरातून निघून गेली. ती परत आली नाही. तिने काळा रंगाचा टॉप व निळी जिन्स घातली आहे. तिच्या नाकाच्या व ओठाच्या मध्ये जखमेचा वर्ण आहे. पुढील तपास पोलिस नाईक निरंजन जाधव करीत आहेत.


चिपरीत गावठी दारू जप्त
जयसिंगपूर ः चिपरी (ता. शिरोळ) येथील शिवाजी बेडगे यांच्या घराजवळ जयश्री प्रकाश कांबळे या बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवली होती. याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी आज सायंकाळी पाचच्या सुमारास कारवाई करून ३५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जयश्री कांबळे यांच्या विरोधात वैभव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.

तरुणावर छेडछाडीचा गुन्हा
जयसिंगपूर : येथील एका कॉलेज युवतीचा पाठलाग करून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तरुणावर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. संबंधित तरुण सहा महिन्यांपासून पीडित युवतीचा पाठलाग करून तुच्याशी बोलायचे आहे थांब, असे म्हणत होता. याप्रकरणी जुबेर खंडाई (जयसिंगपूर) याच्या विरोधात उदगाव येथील पीडित युवतीच्या वडिलांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोटमाळ्यावरून पडून जखमीचा मृत्यू
कोल्हापूर ः माळ्यावरून पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना आज पहाटे मृत्यू झाला. बाळासाहेब यशवंत मगदूम (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. काल ही घटना घडली होती. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88512 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..