संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

४४३७६
डॉ. साताप्पा चव्हाण यांना पुरस्कार
कोल्हापूर ः गणेशवाडी (ता. करवीर) येथील व अहमदनगर महाविद्यालयातील हिंदीचे वरिष्ठ प्रा. डॉ. साताप्पा चव्हाण यांना हिंदी अकादमीचा साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. चव्हाण यांनी हिंदी मराठी तुलनात्मक साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला. डॉ. चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी असून, पदवी शिक्षण घेताना त्यांनी न्यू कॉलेजच्या ''कमवा व शिका'' योजनेतून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी शंभराहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. हिंदी व मराठी पत्रकारिता संशोधन क्षेत्रात डॉ. चव्हाण यांचे योगदान आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांमधून त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘हिंदी पत्रकारिता : जनचेतना’, ‘हंस और राजेंद्र यादव'', ‘स्वाधीन भारतीय समाज और शिवप्रसाद सिंह का कहानी साहित्य'', ‘हिंदी पत्रकारिता : आलोचनात्मक मंथन'', ‘हिंदी भाषा और साहित्य : प्रयोजनात्मक चरण'' या ग्रंथांचे हिंदी विश्वात विशेष स्वागत झाले आहे.
.........
४४३७७
संवाद खेळघराचे उद्‍घाटन
कोल्हापूर : गतिमंद तसेच कमी ऐकू येणाऱ्या तसेच बोलताना अडखळत असणाऱ्या मुलांसाठी संवाद खेळ घरातून चांगली ऊर्जा मिळेल, असे मत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी व्यक्त केले. भेंडे गल्ली येथील संवाद हिअरींग क्लिनिक यांनी सुरू केलेल्या संवाद खेळ घराच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. या खेळघरातून विद्यार्थ्यांचा विकास होण्यास मदत होईल, असे सांगून काही योजना राबविण्यासाठी प्रयत्न करता येतील, अशी ग्वाहीही घाटे यांनी दिली. ‘संवाद''च्या शिल्पा हुजूरबाजार यांनी संवाद खेळ घराची संकल्पना सांगून मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. यश हुजूरबाजार, प्रा. स्वाती गोखले आदी विद्यार्थी उपस्थित होते.
............
‘मोमीन वेल्फेअर’तर्फे गुणगौरव सोहळा
कोल्हापूर ः येथील मोमीन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे मोमीन बिरादरीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे. पहिली ते सातवीच्या सत्तर टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमात होईल. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकांच्या झेरॉक्स संपूर्ण माहितीसह संस्थेच्या इब्राहिम खाटिक चौकातील कसाब मशीदमधील कार्यालयात दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत २४ ऑगस्टपर्यंत जमा कराव्यात, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम देवळे यांनी केले.

संत सेना पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
कोल्हापूर ः येथील श्री सेना (नाभिक) विद्यार्थी गृहातर्फे मंगळवारी (ता.२३) श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. रंकाळा स्टॅंडसमोरील विद्यार्थी गृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध धार्मिक विधींसह पालखी मिरवणूक, समाजातील गुणवंत व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार यावेळी होईल. गेल्या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीला सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनीही गुणपत्रके कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीने केले आहे. दरम्यान, या दिवशी जिल्ह्यातील सलून बंद राहणार आहेत.
............
''सटीप श्रीज्ञानेश्वरी''चे २९ ला प्रकाशन
कोल्हापूर : येथील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि उपासक डॉ. बळवंत तुरंबेकर यांनी संपादित केलेल्या ''सटीप श्रीज्ञानेश्वरी'' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा २९ ऑगस्टला होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाचला कार्यक्रम होईल. महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात संत परंपरेला व संत साहित्याला महत्त्वाचे स्थान आहे. श्रीज्ञानेश्वरी अथवा भावार्थदीपिका ही ज्ञानदेवांची निर्मिती तर अलौकिक असून, काव्य, तत्त्वज्ञान आणि आत्मानुभूतीचे केलेले रसपूर्ण वर्णन यांचा त्रिवेणी संगम आहे. हीच ज्ञानेश्वरी अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्य भाविक आणि वाचकांना कळावी म्हणून डॉ. तुरंबेकर यांनी ''सटीप श्रीज्ञानेश्वरी'' या ग्रंथाची निर्मिती केली आहे. शब्दवेल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन वासकर फडाचे प्रमुख व निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीविठ्ठलपंत तात्यासाहेब वासकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, शिवशंकर उपासे यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथाचे संपादक डॉ. तुरंबेकर व प्रकाशक सतीश पाध्ये यांनी केले.
.............
गुणीदास फाउंडेशनतर्फे उद्या ‘गुरुवंदना’
कोल्हापूर ः येथील गुणीदास संगीत विद्यालयातर्फे रविवारी (ता. २१) गुरुवंदना कार्यक्रम रंगणार आहे. विद्यालयाचे संस्थापक (कै) केशवराव धर्माधिकारी, राजप्रसाद धर्माधिकारी आणि संगीतातील गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होणार असून, विद्यालयाचे विद्यार्थी कला सादर करणार आहेत. देवल क्लबमध्ये सायंकाळी सहाला या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88617 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..