हद्दवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दवाढ
हद्दवाढ

हद्दवाढ

sakal_logo
By

हद्दवाढीसाठी खमकेपणा दाखवणार का?
कमी विरोध, नुकसानीच्या पर्यायाचा विचार होईल; तातडीने निर्णयाची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः हद्दवाढीबाबत प्रस्ताव पाठवा, निर्णय घेतला जाईल, असे सांगणारे राज्यकर्ते आदेश काढताना मात्र एक पाऊल मागे जात असल्याचा अनुभव अनेकवेळा कोल्हापूरवासीयांना आला आहे. कोल्हापूरचा विकास हवा असल्यास राजकीय परिणामांचा विचार न करता सरकारला खमकेपणाने निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी कमी नुकसानीचा व तुलनेने कमी विरोध असलेली हद्दवाढ हा पर्याय होऊ शकतो. काहीच निर्णय न घेण्यापेक्षा नारळ फोडला जावा, अशी अपेक्षा शिंदे-फडणवीसांच्या सरकारकडून आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंतही निर्णय घेतला गेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

१९७२ मध्ये झालेल्या महापालिकेनंतर हद्दवाढ झाली नाही. राज्यातील शहरे मोठी होत आहेत, लोकसंख्या वाढत आहे. नागरी सुविधांवर वाढणारा ताण कमी करण्याचे उपाय योजले जात आहेत. पण कोल्हापूरबाबत काहीच होताना दिसत नाही. साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या शहराची हद्द कमी असल्याने शेजारील ग्रामीण भागात नागरीकरण वाढत आहे. ही बाब राज्यकर्त्यांना माहिती असूनही हद्दवाढीबाबत सरकारच्या पाठी लागल्याचे केव्हा पाहायला मिळालेले नाही. परिणामी, या गंभीर विषयाबाबत पोकळ आश्‍वासनाचा विषय म्हणूनच पाहिले गेल्याची खंत आहे. अनेक संघटना वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे मागणी करतात. राज्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली तर प्रशासनही गतीने कामाला लागेल; पण प्रशासनाची ही एकट्याची लढाई नाही.
यापूर्वीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारच्या कालावधीत निर्णय होता होता थांबला. त्यासाठी काही लोकप्रतिनिधी कारणीभूत होते. आताही तशीच परिस्थिती आहे. अनेकांकडून विरोधाची शक्यता आहे. नुकसान किती होणार, याचा आकडा समोर आणला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारकडून पाऊल मागे घेतले जाऊ नये, अशी अपेक्षा शहरवासीयांची आहे. त्यासाठी गावे टप्प्याटप्प्याने सहभागी करून घेण्याचा मार्ग अवलंबल्यास विरोधाची तीव्रता कमी होईल. गावांना दिल्या जाणाऱ्या सुविधा विचारात घेऊन भविष्यात इतर गावे समाविष्ट करताना फारशी खळखळ होणार नाही. सरकार हा विचार करत असल्याचे समजते. पावसाळी अधिवेशन २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लवकर निर्णय घ्यायचा झाल्यास या कालावधीतही निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका देणार माहिती?
हद्दवाढीचा निर्णय घ्यायचा झाल्यास महापालिका प्रशासनाकडून पूरक माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. त्यात गावे, लोकसंख्या, शेती क्षेत्र यांचा समावेश आहे. अधिवेशनात निर्णय घ्यायचा झाल्यास ही माहिती तातडीने द्यावी लागेल. गेल्याच वर्षी १८ गावे व दोन एमआयडीसींचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याची माहिती तयार आहे. काही गावे कमी करायची झाल्यास ती वगळून प्रस्ताव पाठवला जाऊ शकतो. त्याला फार कालावधी लागणार नाही. सरकारकडून निर्देश आल्यास दोन-तीन दिवसात महापालिकेकडून माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89122 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..