‘हॉटस्पॉट’चा धोका वाढतोय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हॉटस्पॉट’चा धोका वाढतोय!
‘हॉटस्पॉट’चा धोका वाढतोय!

‘हॉटस्पॉट’चा धोका वाढतोय!

sakal_logo
By

45316
45337


‘हॉटस्पॉट’चा धोका वाढतोय!
गडहिंग्लजची वाहतूक समस्या; अपघातप्रवण क्षेत्रामुळे विद्यार्थी-नागरिकांचा जीव टांगणीला
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : गडहिंग्लज शहरातील वाहतूक समस्या जैसे थे आहे. त्याकडे गांभीर्याने पाहण्यासाठी कोणाला वेळच नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे मेन रोडवर ‘हॉटस्पॉट’ निर्माण होत असून त्याचा धोकाही वाढू लागला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांचाही जीव टांगणीला लागत आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविणे लांब राहू द्या, किमान हॉटस्पॉटला तरी पोलिसांची नेमणूक करून वाहतुकीचे नियोजन करण्याची वेळ आली आहे.
गडहिंग्लज शहरातील वाहतुकीच्या प्रश्‍नासंदर्भात ‘कालचा गोंधळ बरा होता...’ असेच म्हणावे लागत आहे. वाहतूक समस्येवर केवळ चर्चाच अधिक होते. शाश्‍वत उपाययोजना मात्र आजपर्यंत झालेली नाही. वाहतूक आणि रिंग रोड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. रिंग रोडच्या विकासाची पहाट कधी उगवते, माहीत नाही. त्यामुळे तोपर्यंत तरी आहे त्या परिस्थितीचा विचार करून वाहतूक समस्या सोडविणे काळाची गरजच आहे.
मेन रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला. सम-विषम पार्किंगची अधिसूचना करून अंमलबजावणी केली. टोचण वाहनही आणले; परंतु गतवर्षीपासून तेही बंद झाले. आता वाहतूक समस्या पुन्हा मूळ रूपात आली आहे. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने शहरातील गर्दी वाढली आहे. पार्किंग आणि वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. सर्वांत मोठा हॉटस्पॉट म्हणून दसरा चौक ओळख बनू पाहत आहे. बसस्थानक ते साधना बुकस्टॉलशेजारील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी एकाही वाहनाला थांबण्यासाठी वेळ नसते. सलग जाणाऱ्या या वाहनांच्या गर्दीतूनच विद्यार्थी, दिव्यांग, वृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. दोन्हीकडे हात करूनच भयभीत चेहऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता पार करावा लागतो. कोठून वाहन येऊन धडकेल याची शाश्‍वती नसल्याने जीव टांगणीला लागतो.
बॅ. नाथ पै प्रशाला सुटल्यानंतर थेट रस्त्यावरच चौकात गर्दी वाढते. तीनही बाजूंनी येणाऱ्या वाहनांनी विद्यार्थी-पालकांचे चेहरे भयभीत झालेले पाहायला मिळतात. वीरशैव बँक चौकातही अशीच परिस्थिती आहे. पिराजी पेठ, काळभैरी रोडवरील शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. या ठिकाणीही वाहनांची रेलचेल कायम असते. मुसळे तिकटी, आयलँडजवळची वाहतूक समस्याही नित्याचीच आहे. याशिवाय बाजारपेठ आणि अंतर्गत गल्लीबोळातील पार्किंगमुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजत आहेत. या परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार तरी कधी, असा प्रश्‍न सर्वसामान्य विचारत आहेत.

चौकट...
शिस्त हवी
शहरातील वाहतुकीला शिस्त नाही, हे सर्वश्रुतच आहे; परंतु किमान हॉटस्पॉटजवळ तरी पोलिसांची नेमणूक करून तेथे शिस्त लावण्याची गरज आहे. वाहनांना थांबवून विद्यार्थी, वृद्ध, महिला व दिव्यांगांना पुढे जाऊ देण्यासाठी पोलिस गरजेचे आहेत. इतर ठिकाणी पोलिस हजर असले तरी अशा ठिकाणी त्यांची अधिक आवश्यकता आहे.

कुठे आहेत हॉटस्पॉट...
- भीमनगर कमान
- वीरशैव बँक चौक
- मुसळे तिकटी
- अहिल्याबाई होळकर चौक
- साधना बुक स्टॉल
- छ. शिवाजी महाराज पुतळा चौक
- कडगाव रोडवरील भगवा चौक
- आजरा रोडवरील चर्चरोड कॉर्नर
- एम. आर. हायस्कूलजवळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89972 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..