शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक
शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक

शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक

sakal_logo
By

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या
आमिषाने ९२ लाखांची फसवणूक

पुण्यापाठोपाठ सांगलीत गुन्हा : फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता

सांगली, ता. २४ : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील एस. एम. ग्लोबल कंपनीचा प्रमुख मिलिंद बाळासो गाडवे (सांगलीवाडी) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनेकांची रक्कम या प्रकरणात अडकली असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गाडवे आणि साथीदार सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्याचा ताबा घेतला जाणार आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे याचा तपास सोपवण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, सांगलीतील एस. एम. ग्लोबल कंपनीचा प्रमुख मिलिंद गाडवे व साथीदार अविनाश बाळासो पाटील यांनी, ‘शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक परतावा मिळेल,’ असे सांगून सांगलीसह पुणे परिसरातील अनेकांचा विश्‍वास संपादन केला होता. सुरवातीला गुंतवणूकदारांना पैसे मिळाल्यामुळे विश्‍वास निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी जादा रक्कम गुंतवली. परंतु नंतर परतावा न मिळाल्यामुळे विचारणा केली, तेव्हा तोटा झाल्याचे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. गाडवे व पाटील यांच्याविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्याबरोबर सांगलीतील अनेकांनी एस. एम. ग्लोबल कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांना परतावा न मिळाल्यामुळे पोलिसांकडे तक्रारअर्ज प्राप्त झाले होते. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी फसवणुकीच्या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सांगलीतील एका गुंतवणूकदाराची ९२ लाख ४ हजर ५१७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गाडवे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्यानुसार गाडवेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नारायण देशमुख, सहायक निरीक्षक श्री. सरनोबत, अंमलदार इरफान पखाली, उदय घाडगे, अमोल लोहार, विनोद कदम, दीपक रणखांबे यांनी ही कारवाई केली.
………….
गुंतवणूकदारांना आवाहन
एस. एम. ग्लोबल कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधून तक्रार द्यावी, असे आवाहन निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.
………….
पुण्यातही गुन्हा
खात्रीशीर दरमहा परतावा, वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ५३ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गाडवे आणि साथीदार पाटील याच्याविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पूनम दळवी (वय ३६, आंबेगाव खुर्द) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गाडवे व पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत.
………….

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90083 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..